दर्जेदार शिक्षण असे देता येईल.

Author: Share:

मी नोकरीस लागले तेंव्हा डी एड झालेली. त्यामुळे प्राथमिक शिक्षिका म्हणूनच रुजू झाले. लहान मुलात रुजले, फुलले, रमले व कधी त्यांची आई होवून गेले कळलेच नाही. हळू हळू मला ती माझीच मुले वाटू लागली. त्यामुळे झाले काय कि मी माझ्याच मुलांना शिकवीत आहे हि भावना दृढ झाली व त्या विध्यार्थी शिक्षक नात्यात ओलावा आला. माया आली. मातृत्वाचा भाव आला. मला माझे आवडीचे काम करायला मिळते आहे व वरून पगारही मिळतो आहे.

मग अजून काय हवे. मला मिळणारा तो पगार नसून ते माझे मानधन आहे असे मी समजते. नंतर माझ्या पतीच्या उत्साहाखातर व माझ्या आवडीखातर मी बी. ए., एम. ए., बी. एड., एम. एस. डब्लू. झाले व आता एम. फील. ही करीत आहे. मला हायस्कूलला किंवा महाविद्यालयात शिफ्ट होता आले असते. पण मला माझी हि निरागस कोवळी मुले कि जी देवाघरची फुले आहेत ती तिथे मिळाली नसती म्हणून मी तो मोह टाळला व आहे या नोकरीत सुखी आहे. देवाघरच्या फुलांचा सहवास आहे ही देवाची कृपाच आहे. त्यामुळे त्यांना तयार करणे, शिक्षित करणे, संस्कारक्षम करणे हि मी माझी देवपुजाच समजते. हे सर्व करीत असताना माझे विध्यार्थी कसे सर्वगुणसंपन्न होतील  त्याकडे मी प्राधान्याने व प्रामुख्याने लक्ष्य देते. त्यासाठी मी नानाविध प्रयोग करीत असते.

  • मुलाची आई होवून शिकविणे हा माझा पहिला व नैसर्गिक प्रयोग.
  • त्यांच्यात मिसळून त्यांच्यासारखे वागणे हा दुसरा प्रयोग.
  • प्रत्यक्ष शिक्षण हा तिसरा प्रयोग.
  • शारीरिक व मानसिक विकासासाठी संस्कारक्षम बनविणे हे मुख्य उद्दिष्ठ ठेवून शिकविणे हा चौथा प्रयोग.

त्यांच्यात रममाण होताना मी त्यांच्यातलीच एक होवून जाते. त्यामुळे मुलांच्या वागण्यामध्ये एक नैसर्गिकपणा येतो. ते मनातील सर्व काही बोलून दाखवतात. शंका मोकळेपणाने विचारतात. कारण मी त्यांच्यात खेळते, त्यांच्याबरोबर गाणी, कविता म्हणते. उडया मारते. गोष्टी सांगते. त्यांच्यासह हसते. त्यांची होवून जाते. त्यामुळे त्यांना माझी म्हणजेच शिक्षकाची भीती वाटत नाही. हा माझा सर्वात यशस्वी ठरलेला प्रयोग आहे.
प्रत्यक्ष शिक्षणामुळे मुलांना समजावणे फार सोपे होते. कारण ती वस्तू त्यांच्या पुढे असते. ती चित्रातली किव्हा लिखित स्वरूपातली नसून ते ती हाताळू शकतात. कारण ती खरी असते. त्यामुळे ते प्रभावित व आनंदित होतात. त्यांना मुलभूत गोष्टी समजल्या पाहिजेत. संवेदानातून त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. संवेदना, माहिती व संस्कार या त्रिवेणी संगमातून जे मिळते ते शिक्षण. थोडक्यात काय तर नैसर्गिकरीत्या मिळणारे शिक्षण टिकते, समजते.

त्यात त्यांना रुची असते. म्हणून ते सहजरीत्या ग्रहण करू शकतात. गाई, म्हशी, शेत, पर्वत, नदी, समुद्र, वाळू, झाडी, पाखरे, जंगल, सूर्योदय, सूर्यास्त, गड, किल्ले, पिके, दहिवर, पोपट, चिमणीचे घर, ढोली, पालखी, न्यायालय, कचेरी, तिथले कामकाज, विमान, झुकगाडी, बैलगाडी, सोनार, लोहार, गोवऱ्या, कळशी, झोपडी, चंद्रमौळी घर, कौलारू घर, सुतार, त्याचे काम, पाटा, वरवंटा, सूप, कोयता, उस, वांगे, फळे, फुले, झाडे, रम्य ठिकाणे त्यांना दाखवली कि मंडळी खुश आणि आपले काम सोपे होवून जाते. पुस्तकातील चित्रात गड किल्ले दाखवण्यापेक्षा गड किल्ल्यावर सहली न्याव्यात.

फुलाफळांची माहिती पुस्तकातील चित्रातून शिकवण्यापेक्षा त्यांना निसर्गात घेवून जावे व त्या वस्तू त्यांना हाताळू द्याव्यात. रंग, गंध, आकार, हाताळणी या सार्या संवेदना त्यांना घेता येतात. हे सर्व म्हणजेच शिक्षण. मी तर अगदी टोकाला जावून असे म्हणेन कि मुलांना मी शिक्षण घेतो आहे असे जेव्हा वाटते ते शिक्षण नव्हे तर आपण हे कसे व केव्हा शिकलो हे त्यानाही कळत नाही अस जेव्हा त्यांना वाटते ते खरे शिक्षण, नैसर्गिक शिक्षण. मुलांना झुकगाडीत बसवावे, विमानात बसवावे, उंटावर बसवावे , हत्तीवर बसवावे, मगर सुसर दाखवावी, नावेत बसवावे. गिर्यारोहण करायला लावावे. पोहायला शिकवावे. ग्रामीण भारत दाखवावा, तसेत मेट्रो सिटीज सुद्धा दाखवाव्यात. शक्य असल्यास परदेशाही दाखवावा.

त्यांना अनुभव घेवू दिला कि मग त्याच्या मनाची मशागत होते व मग त्या सुपीक जमिनीत जीवनमूल्ये पेरणे सोपे जाते. ती लगेच रुजतात, उगवतात आणि सर्वाना आपल्या आदर्श गुणरूपी सुवासाने आकर्षित करतात. त्यांना सर्वगुणसंपन्न नागरिक बनविणे अवघड राहत नाही. त्यांच्या आवडत्या बाईचे ते कोणतेही हटट पुरवतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, या उक्तीप्रमाणे हे होते. नक्की होते. हा माझा यशस्वी प्रयोग आहे. प्रत्यक्ष कृतीतला प्रयोग आहे.

मुलांना चिखलात खेळू द्यावे, अंगाला माती लागू द्यावी, गुलाब तोडू द्यावेत. हाताला काटे बोचू द्यात त्यांच्या. मग ते स्वतःच जपून गुलाब तोडतील. त्यांना प्रत्यक्ष्यात कळू द्या कि कोणतीही चांगली गोष्ट मिळविण्यासाठी त्रास हा सहन करावाच लागतो, प्रयत्न करावाच लागतो, मार्ग काढावाच लागतो. मार्गातील काटे बाजूला सारत सारत मार्ग आक्रमावा लागतो. हा संदेश त्यांना स्वतःला कृतीतून मिळू द्या तुम्ही सांगू नका. म्हणजे ते जपून वागतील. जपून कृती करतील यालाच शिक्षण म्हणतात. घोड्याला पाण्याजवळ नेतात. पाणी त्यांनाच प्यावे लागते. त्यांना भरवू नका . स्वतःला खावू द्यात. सांडेल थोडे सुरुवातीला , सांडू द्यात . प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे ते स्वतःच स्वावलंबी बनतील. ही व अशी अनेक जीवनमूल्ये कृतीतून त्यांच्या अंगी रुजली पाहिजेत. पालकांचे व शिक्षकांचे काम फक्त हे आहे कि त्यांना तसे वातावरण निर्माण करून देणे. कृती मात्र त्यांना करू द्यावी म्हणजे ते सक्षम होतील. हा कृतीशील प्रयोग आहे.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


यासाठी शैक्षणिक साहित्याची जरुरी नाही. जरुरी आहे ती निसर्गात पोहोचण्याची. पालक व शिक्षकांच्या मानसिकतेची. मनात असेल तर ध्यानात येतेच. ध्यानात आले कि कृतीत उतरते.

मी शालेय उपक्रमात अनेक प्रयोग करते. मुलांना त्यात सहभागी करून घेते. त्यांच्या मार्फतच ते करते. उदाहरणार्थ विविध गुणदर्शन कार्यक्रम, वार्षिक स्नेहसम्मेलनातील शाळेचा आढावा, नाटक लिहिणे, दिग्दर्शित करणे, बसवणे. हे कार्यक्रम बसवून ते आकाशवाणीवर सादर करणे, विविध स्पर्धेमध्ये ते पाठवणे. यामधून आमच्यासारख्या शिक्षकांना आमच्यात असणाऱ्या गुणांना व्यासपीठ मिळते. मुले तयार होतात. त्यांचा उत्साह वाढतो. नवनवीन लोकात कसे वावरायचे, नवनवीन माध्यमांना कसे हाताळायचे, हे शिक्षण मी, माझा सहकारी वर्ग, विध्यार्थी यांना तसेच माझी शाळा, माझी संस्था, यानाही त्या उपक्रमाने अभिमान वाटतो. सर्वांनाच फायदा होतो. आनंद होतो. उत्कर्ष होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत, सर्वगुण संपन्न विध्यार्थी तयार होतो. यालाच मी शिक्षण मानते. फक्त पुस्तकी शिक्षण कामाचे नाही. निरस आहे. जीवनाभिमुख नाही. त्याला वास्तविकतेचे पाणी घातले कि जीवनाची बाग कशी बहरून येते. तरारून पिक येत. निसर्गराजाची कृपा होते आणि निसर्ग किंव्हा नैसर्गिकता म्हणजेच ईश्वर असे मी मानते. त्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवते.

वरील सर्व उपक्रमात संदेश, जीवनमूल्ये भरलेली असतात. ती कळत नाहीत, दिसत नाहीत पण अंगी मुरतात. तेच तर आपल्याला पाहिजे आहे. मागील वर्षी मी लिहिलेले बालनाट्य ‘लालयेत पंचवर्षांणि’ खूप गाजले. मी दिग्दर्शीत केले, मुलाकडून बसवून घेतले. त्यात शून्य ते पाच वयोगटातील मुलांशी, पालकांनी व शिक्षकांनी कसे वागावे याचेच मार्गदर्शन आहे व काही गैरसमजावर ओरखडेही ओढलेले आहेत, पण ते पटतील असे. त्याला खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली व त्यातून बरीच जीवनमूल्ये मला नकळत नैसर्गिकरीत्या देता आली. त्या नाटकास बरीच पारितोषिके मिळाली लेखनाची, तेच बालनाट्या मी आता यावर्षी महाराष्ट्र राज्य बालास्पर्धेत उतरवले आहे. यामधून पालकांना, शिक्षकाना खुप शिकण्यासारखे आहे.

लहान मुले लवकर ऊठावीत, लवकर झोपावित यासाठी मी सूर्योदय व सुर्यास्त दाखवण्याचा उपक्रम केला. मुले पलक खुश. यातून सूर्याची नियमितता व आपली नियमितता समजावून सांगितली. पालकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन केले, केवळ मुलांच्या चांगल्या सवयीसाठी.
बालकांचे मन फार उत्सुक असते. त्या उत्सुकतेला आपण प्रतिसाद दिला कि ते खुलते, फुलते. अन्यथा कोमोजते, हिरमुसते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे आवश्य द्यावीत. त्यातून शिक्षण दिले जाते. तो त्यांना शिक्षण देण्याचा अगादी योग्य व सुकर मार्ग आहे. म्हणून मी एक उपक्रम सातत्याने राबवीत आहे. मुलांना जे जे प्रश्न पडतील ते ते त्यांनी घरी विचारावेत, मित्रांना विचारावेत, शेवटी मला तर विचारावेतच विचारावेत. ते लिहून ठेवावेत. आठवड्यातून किमान एक तरी प्रश्न जीवनातला, निसर्गातला, आजूबाजूचा, औसुक्याचा विचारावा.

त्यासाठी मी त्यांना वेगळी वही करायला सांगितली आहे. त्यावर माझी सही असते. तर तो माझा शैक्षणिक उपक्रम मला व माझ्या मुलांना इतका आनंद देवून जातो कि विचारू नका. त्यातले काही उदाहरणदाखल प्रश्न मी देते ते असे. सूर्य पूर्वेलाच का उगवतो व पश्चिमेलाच का मावळतो ? तो इतर दिशांना का नसतो ?, गायीच्या पोटात कोट्यावधी देव कसे काय बसतात, इतक्या गर्दीत? गायीला त्रास होत नाही का ? मग ते म्हशीच्या किव्हा इतर प्राण्याच्या पोटात का नाही बसत ? ते आम्हाला पाहायला मिळतील का ? हे आणि असे कित्येक प्रश्न असतात आणि माझा अनुभव सांगतो तेही मुलाकडून मिळालेल्या फिडबेकनुसार कि पालक व जेष्ट मंडळी हे सांगायचे टाळतात व त्यालाच दटावतात कि, तू तुझा अभ्यास कर, ह्या चांभारचौकश्या करू नकोस. तू अजून लहान आहेस. अरे तुम्हाला माहित नाही म्हणून सांगा ना सरळ. किंव्हा माहित करून घ्या व मग त्याला सांगा पण त्याला दटावण्यात काय अर्थ आहे?

असो तर असे अनेकविध प्रयोग शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मी करीत असते. खूप सांगायचे आहे पण शब्दाची मर्यादा असल्याने मी इथे थांबते. धन्यवाद.

लेखिका…सौ. सविता पांडुरंग कुलकर्णी.
( प्राथमिक शिक्षिका व अधीक्षिका, नवीन मराठी शाळा व बालमंदिरनाशिक )
मोबाईल ..७७६९०५५८८३ / ७७६९०५५८८३

सौजन्य: साहित्य उपेक्षितांचे, निलेश बामणे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

सेन्सेक्सची ५७७ अंशांची झेप: ३३५०० ची पातळी ओलांडली

Next Article

ओझं

You may also like