आनंदाचे निधान

Author: Share:

रस्त्याने चालता चालता अचानकपणे न आठवणारी एखादी गाण्याची ओळ आठवली तर मनात सटकन लहर उमटते आनंदाची… चालता चालता समोरुन एखादं गोंडस बाळ खुदकन पाहुन हसत आपल्याकडे…  कधीतरी अचानकपणे मनात रेंगाळणारा एखादा पदार्थ समोर येतो त्यावेळी साधलं जातं ते आनंदाच निधान  ! सहजपणे रोजच्या दिवसात घडत जाणा-या प्रसंगांमधुन आनंदाची अशी हलकी फुलकी फुलपाखरं भिरभिरत असतात आपल्या अवतीभवती. क्षण एक पुरे प्रेमाचा…. वर्षाव पडो मरणाचा अस एका श्रेष्ठ कवींनी लिहुन ठेवले आहे.

 

अगदी तसेच, क्षण एक पुरे आनंदाचा असे आपल्याला म्हणता येईल. तसंही जीवनाचे सत्य वर्तमानकाळ हेच आहे. भविष्याची मारे किती कल्पना आणि कितीही कल्पनाविलास केला तरी… सत्य फक्त इतकंच …. मिळालेला आजचा दिवस ! आताचा क्षण हा खरा महत्त्वाचा…  त्यासाठीच उठल्याउठल्या स्वत:शीच म्हणायचं …. ” आजचा दिवस मला साजरा करु दे” आणि मग पुढे काहीही येत राहेा, त्यातूनच आनंदाचे क्षण वेचायची,  टिपायची आस मनाला लागून रहाते.

 

अगदी शुल्लक वाटणा-या गोष्टींमधूनही आनंदाची झुळुक मनाला प्रसन्न करुन जाते. त्यासाठी आनंदाच मोठ्ठं घबाडच हाती लागायला हवं असे नाही. मात्र आनंदाच्या दिशेने एक पाऊल उचलायची तयारी आपण ठेवली तरी तो आपल्या अंगावर  अक्षरश:  धावून येतो. त्याकरीता आपण सजग असायला हवे आणि थोडं स्वप्नाळूही……

कवीवर्य श्री. विं. दा. करंदीकरांनी एका कवितेत लिहिले आहे,

 

मनात माझ्या उंच मनोरे

उंच तयावर कबुतरखाना

शुभ्र कबुतर घुमते तेथे

स्वप्नांचा खाऊनिया दाणा…..

 

असे शुभ्र, स्वप्नाळु मनाने आनंदाचे क्षण शोधीत शोधीतच दिवसाची आपली नित्य कर्मे पार पाडता यायला हवीत. त्यासाठी वृत्तीत आनंदाचे कंद रुजलेले हवेत… मग छोटया छोटया क्षणांमधुनही आनंदाची फुले मन सुगंधीत करीत जातात… आनंदाचे निधान सापडत जाते… दिवस साजरे होत जातात….  ||

 

@मनीषा वायंगणकर,

ठाणे

Previous Article

आला श्रावण

Next Article

बौद्ध आणि बाप्पा: तत्त्वज्ञान आणि संविधान

You may also like