सौंदर्य

Author: Share:

आज सकाळी सकाळी एका खूप देखण्या आणि रुबाबदार माणसाचा फोटो पहिला, आणि खरं सांगते, बघतच राहिले! तो माणूस कोण, त्याचं नाव काय असल्या निर्रथक तपशीलांपेक्षा त्याचं अनोळखी तरीही देखणं सौंदर्य मनात दिवसभर रुंजी घालत राहिलं!

सुंदर आणि कुरूप या संकल्पना अनेक गोष्टी गाण्यांतून लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवल्या जात असतात. गाढवं-डुकरं हे प्राणी ओंगळ आणि कुत्रा मांजरी, गायी इ. पाळीव प्राणी चांगले, मोर रंगीबेरंगी म्हणून सुंदर तर कावळा काळा म्हणून कुरूप असं वर्गीकरण तेव्हापासून मनात तयार व्हायला लागतं. काळा रंग म्हणजे तर कुरूपतेच हमखास लक्षण मानलं जातं. गोरा रंग म्हणजे सुंदर आणि जरा त्यात काळी किंवा सावली छटा मिसळली की सौंदर्य कमी झालंच म्हणून समजा! दुर्दैवाने अजूनही हे समज खूप खोलवर रुजलेले आहेत. काळ्या रंगामधलं सौंदर्य लोकांना कधी कळणार? चंद्र-चांदण्याचं शुभ्रपण रात्रीच्या काळेपणामुळेच उठून दिसतं न? काळ्या पाटीवर काढलेला पांढरा ‘श्री’ पाटी काळी नसती तर तितका मंगल वाटला असता का? काळीशार पाटी, त्यावरची शुभ्र सरस्वती, केशरी गंध आणि रंगीत फुलांनी केलेली आरास यामुळेच दसरा अधिक प्रसन्न वाटतो, निदान मलातरी! बाकीच्या गोष्टींचे रंग कुठलेही असले, तरीपाटीचं काळेपण हरवलं, तर त्या पूजेचा सगळा तोलच बिघडून जाईल. आपल्या सगळ्या संताना आवडले ते विठोबा आणि कृष्णसुद्धा काळे-सावळेच..!! कारण ते सौंदर्य या मातीतलं इथलं आहे!

       सौंदर्याची पारख करताना एक आणि एकच गोष्ट जवळ असावी लागते ती म्हणजे नजर! सौंदर्य तुमच्या नजरेत असावं लागतं. सृष्टीभर पसरलेल्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची सवय आणि वळण एकदा तुम्ही तुमच्या नजरेला लावलंत की कुरूप म्हणून काही उरतच नाही! संथ वाहणारी नदी, खळखळणारे झरे, गंभीर समुद्र जितका सुंदर असतो, तितकंच सौंदर्य पावसाळ्यातल्या एखाद्या तात्पुरत्या साठलेल्या डबक्यातसुद्धा अवचित सापडू शकतं. शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारं नसलं, तरी काही क्षणांपुरतंही ते सौंदर्य आपल्याला तीच आनंदाची अनुभूती देत असतं. कुंडीत आखून रेखून फुलणाऱ्या झाडाप्रमाणेच जंगलात अस्ताव्यस्त वाढणारी रानटी झुडूपंसुद्धा सुंदरच असतात. आणि सौम्य, मृदू बोलण्याप्रमाणेच रांगडं पण मनातल्या भावना नेमक्या व्यक्त करणारं ग्रामीण बोलणं ही सुंदरच असतं. सौंदर्याचा साक्षात्कार होण्यासाठी कायम भव्यदिव्य डोंगर दऱ्याच अनुभवाव्या लागतात असं काही नाही, घराच्या छोट्याशा खिडकीतून हळूच डोकावणारी फांदी आणि तिच्यावर जगणारे असंख्य दृश्य-अदृश्य जीव पाहूनसुद्धा आपल्याला थक्क व्हायला होतं..फक्त.. तुमच्याकडे ती नजर असायला हवी, आणि मनसोक्त आस्वाद घ्यायची तयारीही!

माझा एक मित्र कायम म्हणतो, की माणसाने दारू एकतर प्यावी, किंवा पिऊ नये, तब्येतीची काळजी करत एखाद-दोन घोट घेणं हा दारूचा आणि त्यामागाच्या बेहोषीचा- दोन्हीचा अपमान आहे. मुद्दा मला पचवायला जरा कठीण असला, तरी सौन्दार्यास्वादाबाबत मात्र हे बऱ्याच अंशी खरं आहे. घाबरत, आणि पावलोपावली लोक काय म्हणतील याचा विचार करत, कच खात जगत असताना सौंदर्य सापडूच शकत नाही. कारण आपल्याला काय सुंदर वाटतंय हे अनुभवण्यापेक्षा आपल्याला हे आवडतंय यावर लोक काय म्हणतील याचा विचार करण्यातच वेळ आणि बुद्धी अधिक खर्च पडत रहाते. आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते हे उघडपणे स्वीकारायलासुद्धा धाडस लागतं! अन्यथा पुन्हा एकदा लोकांच्या प्रतिक्रियांची काल्पनिक चिंता आपल्याला पोखरत रहाते. याचा नेमका अनुभव येतो तो मानवी सौंदर्याबाबत!

एखादा पुरुष किंवा स्त्री सुंदर आणि देखणे आहेत असं उघडपणे म्हणणं अजूनही थोडं दचकवणारंच वाटतं. विशेषत: एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या किंवा स्त्रीने पुरुषाच्या(इथे जरा आणखी जास्त धक्के बसतात!) सौंदर्याची उघड स्तुती करणं पचनी पडायला अवघड जातं. लग्गेच भुवया आणि नजरा विस्फारल्या जातात! एखादा डोंगर, नदी, पाउस, ओढा, प्राणी-पक्षी, फुलं-पानं चंद्र-सूर्य, तारे-ग्रह इतकंच कशाला, एखादा पदार्थ, कपडा, रांगोळी, घर अशा गोष्टीना जितक्या सहजपणे सुंदर म्हटलं जाऊ शकतं, तितक्याच सहजपणे आणि निष्पापपणे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या सौंदर्याला दाद दिली तर त्यात वावगं काय? सौंदर्याच्या कबुलीमध्ये त्याच्या प्राप्तीचा अट्टहास कायम गृहीत का धरला जावा? पाण्याचं सौंदर्य बघण्यासाठी कायमच पाण्यात उतरावं लागेल असं काही नाही.. काठावर बसूनसुद्धा त्याचा आस्वाद घेता येतोच की! किनाऱ्यावर बसून दाद दिली तर समुद्राचं सौंदर्य कमी होत नाही, आणि आपलं आस्वाद घेणंसुद्धा!

एखादी गोष्ट बेभान होऊन करण्यात सौंदर्य असतं. त्याचप्रमाणे अनेकदा नियम आणि आवश्यक त्या चौकटी मान्य करूनच सौंदर्याचा परिपूर्ण आस्वाद घेता येऊ शकतो. किंबहुना निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद हा त्याचे नियम मान्य करून घेतला तरच तो स्वर्गीय ठरतो. जोवर तो आणि आपण मर्यादेत असतो, तोवर सुंदर असतो, मात्र एकदा का त्यच्या मर्यादेच उल्लंघन झालं- मग ते माणसाने केलं किंवा निसर्गाने -तरी  घातक आणि संहारकच ठरतं! कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातक ठरतो, हा नियम याबाबतीतही लागू आहेच. त्यामुळे सहजता न सोडता सौंदर्याचा अनुभव घेणं श्रेयस्कर असतं. त्यातली सहजता आणि मर्यादा टिकवता आली की मग काय…

        हे जीवन सुंदर आहे.. जिकडे तिकडे संगीत अनामिक एकच घुमते आहे.. हे जीवन सुंदर आहे..

लेखिका: मैत्रेयी जोशी

Previous Article

नांदगाव-संकल्पना दिवाळी:एक हात मदतिचा; वर्ष: २

Next Article

आयुष्य …..

You may also like