बौद्ध आणि बाप्पा: तत्त्वज्ञान आणि संविधान

Author: Share:

हिंदू धर्मातील उत्सवांच्या काळात टीका किंवा हसू करणारे मेसेजेस एव्हाना नित्याचा भाग झाला आहे. ज्याने त्याने आपापल्या विचारांप्रमाणे आणि श्रद्धेप्रमाणे आचरण करावे, या संविधानात उद्देशपत्रिका आणि संविधानामध्ये दिलेल्या अधिकाराची पायमल्ली, अशा मेसेजेस मधून होत असते. आतापर्यंत कुणीही, या प्रकरणाला गंभीर स्वरूप दिलेले नाही, ना या गोष्टींमुळे हिंदूंच्या धर्माभिमानावर काही ओरखडा उठला आहे. या गणपतीस पुढे आलेला प्रकार मात्र काहीसा वेगळा आहे. बौद्ध धर्मियांनी गणपती बसवला, म्हणून काही नवबौध्दियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिज्ञांचा दाखला देऊन, हे कृत्य समाजविरोधी असल्याचा फतवा अशा मंडळींविरोधी काढल्याचे वृत्त पुढे येत आहे. नवबौद्धांचे जे कृत्य संविधानविरोधी आणि समानतेच्या मूल्यांच्या विरोधी आहे, हे दुर्दैवाने, विरोध करणाऱ्याना लक्षात आलेले दिसत नाही. संविधानातील किमान चार कलमांचे यामुळे उल्लंघन होत आहे.

ईश्वर हि फार व्यापक संकल्पना आहे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातही देव या संकल्पनेचे तत्वज्ञान हा एक वेगळा विषय असतो. ईश्वराची संकल्पना बहुतांशी धर्मात आढळते. मग तो पौरूषेय धर्म असो वा हिंदूसारखा अपौरुषेय धर्म! भारतातही ईश्वर  संकल्पना वैदिकांच्या आधीच्या (किंवा समकालीन) हडप्पा संस्कृतीत अशा रीतीने आढळते, की आजही हिंदू त्यातील काही प्रथा पाळतात.थोडक्यात, ईश्वर हि संकल्पना सर्व धर्मानी थोड्याफार फरकाने स्वीकारली आहे. सृष्टीचे नियमन, एक व्यापक शक्ती करते ही ती संकल्पना आहे.

हिंदू धर्मात ह्या शक्तीला अनादी अनंत असे वर्णिले आहे. त्याला ब्रह्म असे म्हटले आहे, आणि ते ब्रह्म मी आहे, ह्या व्यापक विचारांवर येऊन ही संकल्पना पोहोचते. हे सांगण्याचे कारण एवढेच आहे, की हिंदू धर्म अतिशय व्यापकतेच्या दृष्टीने ईश्वर, सृष्टी, निसर्ग आणि सर्व सजीव, निर्जीव यांच्याकडे पाहतो, तो व्यापकतेचा दृष्टिकोन ईश्वर संकल्पनेतही आहे. त्यामुळे, हिंदू धर्मीयाला आपल्या ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यासाठी इतर धर्मातील ईश्वरांना नाकारण्याची आवश्यकता नसते. ह्या व्यापकतेमुळेच हिंदू ईश्वरी संकल्पनेकडे इतर धर्मीय आणि पाश्चिमात्य आकर्षित झालेले दिसतात आणि ते यापुढेही होत राहतील.

हे सर्व सांगण्याचा उद्देश्य एवढाच की, नवबौध्द किंवा बौद्ध, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मातील व्यक्ती, आपल्या धर्मविचारांवर किंचितसाही लवलेश न येता, हिंदू देवतेच्या प्रेमात पडू शकतात, त्यासमोर नतमस्तक होऊ शकतात. ही सुरक्षिततेची भावना, त्यांच्या मनात असू शकते, याचे कारण हिंदू धर्माची व्यापकता आहे. जे अहिंदूधर्मीय हिंदू देवतांची उपासना करतात, त्यांच्या बाबतीत हे फार मोठे कारण लक्षात घेण्यासारखे आहे. दलाई लामा निश्चिन्तपणे शंकराच्या पिंडीवर दूध वाहतात ते याच विश्वासामुळे. त्यामुळे, भाऊ आणि ज्यांनी बाप्पा आपल्या घरी आणले असतील, त्यांनी निश्चित राहावे, यांनी त्यांच्या धर्मावर अजिबात बालंट आणलेले नाही. तुम्ही यापुढेही निःसंशय बाप्पा आणू शकता आणि यामध्ये गौतम बुद्ध, बौद्ध धर्म, तत्वज्ञान, डॉ आंबेडकर कुणाचाही किंचीतसाही उपमर्द करीत नाही आहात, याची हिंदू धर्म आपल्याला खात्री देतो.

आता अध्यात्मिकतेतून भौतिकतेत येऊया!

प्रत्येक भारतीयाला संविधानाने धार्मिक बाबतीत तीन अधिकार दिले आहेत.

१. उद्देशपत्रिका अर्थात प्रिएम्बल मध्ये, स्वातंत्र्य: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, पूजा, उपासना यांचे

२.  कलम २५: सद्सद्विवेकबुद्धीने वागण्याचे (फ्रीडम ऑफ कंसायन्स), धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचे, त्याप्रमाणे आचार आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.

३. कलम २१: प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.आता गोपनीयतेचा अधिकारही यात समाविष्ट झाला आहे, आणि त्याला याच कलमाची झालर आहे.

ह्या दोन्ही अधिकारातील शब्द आणि भाषा नीट पहा. प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य आहे, कसले? विचाराचे, अभिव्यक्तीचे, विश्वास, श्रद्धा, पूजा आणि उपासनेचे. मी कुठला धर्म स्वीकारावा आणि त्याचे पालन करावे याचे जसे मला स्वातंत्र्य आहे, तसेच , मी कुठले विचार करावेत, कशावर विश्वास ठेवावा, कुणावर श्रद्धा ठेवावी आणि कशाची उपासना करावी याचेही स्वातंत्र्य आहे. हा मुद्दा नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा, की मी कुणाची उपासना करावी, कुठल्या तत्वावर आणि विचारांवर श्रद्धा ठेवावी याचे पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. कुणीही, माझ्या धर्मातील व्यक्तीही आणि संकल्पनाही तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत. एखाद्या बौद्ध व्यक्तीने गणपती घरी आणला तरी तो त्याच्या उपासनेचा आणि विश्वासाचा भाग आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, हिंदू देवतेसमोर हात जोडल्याने, माझा धर्म बदलत नाही याचा त्या व्यक्तीला विश्वास आहे. या विश्वासाला संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील या अधिकाराची जोड दिली, तर एखाद्या बौद्धाला कुठल्याही देवतेची उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. अर्थात, इतर धर्मातील ईश्वर मानण्यासाठी त्या धर्माचा अनुयायी होणे आवश्यक आहे. हिंदू धर्मातील ईश्वरांविषयी तसे नाही. त्यामुळे, त्याला गणपतीवर श्रद्धा असेल, किंवा बाप्पाचा उत्सव आवडत असेल, किंवा बाप्पासोबत घरी येणाऱ्या पवित्रतेची अनुभूती आवडत असेल, किंवा अगदी बाप्पाचे मोहक रूप आवडत असेल, काहीही कारणाने बाप्पा घरी येत असतील, तर त्याला अडवले जाऊ शकत नाही.

कलम २५ पहा. यात ‘सद्सद्विवेकबुद्धी’चे स्वातंत्र्य आहे. हा शब्द फार मोठा आहे. सुजाण वाचकांसमोर त्याचा विस्तार करणे मला आवश्यक वाटत नाही. गणपती बाप्पाची मूर्ती आणणे, कुणाच्याही सद्सद्विवेकबुद्धीला पटत असेल तर, तर ते स्वातंत्र्य, कुणालाही आहे.

कित्येक हिंदूंच्या घरी तथागतांची मूर्ती किंवा पेंटिंग असते. तथागतांचे विचार त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटतात, म्हणून तथागत हिंदूंच्या घरी विराजमान होतात. त्याने हिंदू अहिंदू होत नाही. थोडक्यात, मी काय श्रद्धा ठेवावी, कुणाची उपासना करावी, कुठला धर्म मानावा आणि मानू नये ही सद्सद्विवेकबुद्धी प्रत्येक व्यक्तीकडे असेल, आणि तो त्याप्रमाणे आचारण करण्यास स्वतंत्र आहे आणि कलम २५ माझ्या या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. मला कुणी तसे करण्यापासून रोखत असेल तर ते कृत्य असंवैधानिक आहे.

याच कलमात, धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्य आहे. यात उद्देशपत्रिकेतिक आचरण समाविष्ट आहे. त्यामुळे, जर माझी सद्सद्विवेकबुद्धी सांगत असेल, की एखादी श्रद्धा मला ठेवावीशी वाटते आणि त्याने माझ्या धर्मास बाधा पोहोचत नाही (हा निर्णयाचा अधिकार माझा आहे, तथाकथित, धार्मिक ठेकेदारांचा नाही) तर ती उपासना किंवा आचरण मी ठेऊ शकतो.

अन्यथा, माझ्याविरुद्ध गरळ ओकणे, माझ्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करणे आणि बातम्या किंवा सोशल मीडियातून माझी बदनामी करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली आहे. यामध्ये नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “राईट टू प्रायव्हसी” अर्थात गोपनीयतेच्या अधिकाराचीही जोड दिली गेली, तर बौद्धांना बाप्पा घरी आणण्यापासून रोखणारे कृत्य किती असंवैधानिक आहे, हे समजून येईल.

इथे, नवबौध्द एक वेगळा धर्म म्हणून विचारात घेतले आहेत. बौद्ध हा हिंदूंपासून वेगळा धर्म आहे की नाही या तात्विक चर्चेत सध्या आम्ही पडत नाही. तसेच, ज्या पूर्वाश्रमीच्या दलित म्हणवल्या गेलेल्या हिंदू बांधवांनी, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही, आणि ते सर्वस्वी हिंदूच आहेत, त्यांच्याही विषयी इथे आम्ही बोलत नाही, कारण, ज्यांना बाप्पा घरी आणल्यास दोष दिला गेला आहे, ते बौद्ध आहेतअसे आम्ही गृहीत धरत आहोत. नवबौध्द नसलेल्या, केवळ पुर्वाश्रमी दलित म्हणवल्या गेलेल्यांना जर रोखले जात असेल तर ते धार्मिक दृष्ट्याही चुकीचे आहे. दलित आणि नवबौध्द यामध्ये फरक करण्याची आवश्यकता आहे.

गौतम बुद्धांच्या मूर्तीवर, नेहमी पूर्णत्वाचे आणि वैचारिक संतुलनाचे भाव असतात. म्हणून ते शांत असतात. बाप्पाकडे पाहिले की सुद्धा असाच निरागस गोडवा जाणवतो. हाच निरागसतेचा गोड्वाले दोन्ही धर्मातील समानता आहे. डॉक्टरांनी जेंव्हा अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेंव्हा याच निरागस शिकवणीची दीक्षा नवबौद्धांनी घेणे आवश्यक आहे, तथागतांचे तत्वज्ञान दोषारोप करणे , गरळ ओकणे, असंवैधानिक वागणे यास अनुमती कदापि देत नाही. एकमेकांचा आदर करण्याचीच शिकवण ते देते.

असो, तत्सम बौद्धांनी किंवा इतर धर्मियांनी आणि पाश्चिमात्यांनी बाप्पा घरी आणणे, किंवा कुठल्याही हिंदू ईश्वराची उपासना करणे, हे हिंदू तत्वज्ञानानुसार त्या धर्माचा धर्मभेद करीत नाही, आणि माझ्या मताविरुद्ध आचरण करण्यापासून रोखणे हे असैविधानिक आहे, या दोन्ही कारणास्तव बाप्पा घरी आणण्याचे ते कृत्य योग्य होते आणि त्याला रोखणे चुकीचे आहे.

बाकी बाप्पा बुद्धीची देवता आहे. समाजाची सद्सद्विवेकबुद्धी कायम राहावी ही तिच्या चरणी प्रार्थना आणि या सद्सद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचे रक्षण संविधानाने करीत राहावे ही न्यायदेवतेचरणी प्रार्थना!

Previous Article

आनंदाचे निधान

Next Article

श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर

You may also like