पेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…

Author: Share:

१६ ऑगस्ट चा दिवस एक काळाकुट्ट दिवस म्हणून माझ्यासाठी आणि अनेक बापु (गजानन) आहेर यांच्या मित्र परिवाराला व चाहत्यांना वर्तमान पत्राच्या सर्वच सहकारी मित्रांसाठीचा म्हणावा लागेल. सकाळी नऊच्या दरम्यान सहज व्हॉटसऍप पाहत होतो आणि अचानक व्हॉटसऍपवरील एक बातमी काळीज चिरून गेली. बापु (गजानन) माधवराव आहेर आपल्यात नसल्याची बातमी एक मनाला अस्थीर करून गेली. बापु नाही हे माझे मन मानायला तयारच नव्हते त्या बातमीने मन अस्वस्थ झाले, काहीवेळ काहीच सुचेनासे झाले कारण दोन दिवसापुर्वीच मोबाईलवरून बोलुन झालं होत की, आता तब्येत बरी आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पुण्याहुन नांदगावला येतो. खुप दिवस झाले भेटून, आपण भेटु खुप गप्पा मारू, पाच सहा महिण्यांचा गप्पांचा कोटा भरून काढायचा आहे, असे ठाम आत्मविश्वासपुर्ण आस्वासन मला दिल्यामुळे या बातमीने बापु या जगात नाही हे ऐकूऩ घ्यायला माझे मन तयारच नव्हते.

वाटायचं ही बातमीच खोटी असावी. पण बातमी खोटी ठरविणे नियतीला मान्य नसावे. पण सत्य मात्र स्विकारावेच लागते नियतीने ती बातमी खरी ठरवली आणि धरणी दुभंगावी तसे माझे मन दुभंगले. गेल्या अनेक वर्षाची आमची चिर:कालीन मैत्री, निस्वार्थ असलेला मैत्रीतला एक हिरा, दुःखद निधनाने हरवला होता. या बातमीनेच डोळ्यातील अश्रु ओघळु लागले. काय होते आहे हे सुचतच नव्हते. एक हसरा, विनोदी, दिलदार व दिलासा देणारा सच्चा मित्र अचानक सोडुन गेला. सतत बापुने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, पत्रकारीता क्षेत्रातील मला दिलेले मोलाचे सल्ले व त्यातील खाचा खोचा सांगणारा मार्गदर्शक, मला सावरणारा आधारवड या जगात नाही या कल्पनेनेच मन आजही अस्वस्थ होत आहे. बापुंचं जाणं हे आमच्या सारख्या अनेक चाहत्यांना चुरचुर लावुन गेला आहे. पत्रकारीतेच्या व माध्यमातील क्षेत्रात जिल्ह्यातील एक दरारा निर्माण करणारा व सचोटीच्या जोरावर आपला ठसा उमटवणारं व्यक्तीमत्व, समाजातील प्रत्येक घटकाला आपलसं वाटणारा दिलदार पत्रकार व सुंदर हस्तक्षर असणारा समाज मनाची अचुक नाडी ओळखुन वर्तमान पत्रात परखड लेखन करणारा पत्रकार आणि संकट काळात धीर देणार व्यक्तीमत्व म्हणजे बापु होय. असे व्यक्तिमत्व अचानक गेल्याने आमच्या मित्र परिवारावर व कुटुंबीयांवर एक मोठा दुःखाचा डोंगरच उभा राहीला आहे. रोजच्या दिनक्रमातील पेपरस्टॉलवर जाण्याची सवय व सकाळ आणि सायंकाळची गप्पांनी रंगणारी मैफिल आता सुनी सुनी झाली आहे. मित्रांच्या घोळक्यातील बापु नावाचा मित्र आता शोधणे कठीण आहे.

आजही बापुंच्या आठवणीने मन हेलावुन जात आहे. त्यांच्या अनेक आठवणींनी मनात घर केल आहे. बाणेश्वराच्या दर्शनाची, नस्तनपुरच्या शनिमहाराजांच्या दर्शनाची आठवण असो अथवा वणी येथील व नाशिक येथील पत्रकार दिनाच्या मिटींग मधला सहभाग व प्रवासातला आठवणीने घरून आणलेला नाष्ट्याचा अथवा जेवणाचा डबा मित्रांमध्ये शेअर करणारा बापुंचा सहवास एखाद्या पारिजातकाच्या सुगंधा सारखा असायचा. त्यांची दिवसभरात भेट झाली नाहीतर तो दिवस मला कंटाळवाणी जात असे, एवढी जवळीकता आणि एकमेकांबद्दलची आपुलकी बापुच्या मैत्रीने झाली होती. रोज सकाळ संध्याकाळ आमची भेट पेपर स्टॉलवर असायची. ती भेट आता होणार नाही. सुख-दु:खाच्या गुज गोष्टी आता कुणाकडे शेअर कराव्यात हा प्रश्न मनात घर करत आहे. बापुंचे असे अचानक जाणे मला व बापुंच्या असंख्य मित्रपरिवाराला, नातेवाईकांना पोरके करून गेले. हा दुःखाचा डोंगर सावरण्यास हे ईश्वरा बापुंच्या चाहत्यांना, मित्रांना, नातेवाईकांना शक्ती दे! सतत हसतमुख आणि आनंदी असणाऱ्या बापुंना चिरःकाळ शांती दे… एवढीच परमेश्वरा प्रार्थना!!

बापुंना भावपूर्ण श्रद्धांजली!

लेखक: प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव

Previous Article

रूप ‘तीचे’ पाहता

Next Article

नसतेस घरी तू जेव्हां

You may also like