Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बाळासाहेब ठाकरे

Author: Share:

जन्मदिन: २३ जानेवारी १९२३

स्मृतिदिन: १७ नोव्हेंबर २०१२

ज्या राजकारण्यांनी महाराष्ट्रातीळ जनतेवर गारुड टाकले त्यांच्यामध्ये अग्रस्थानी असलेले बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनापक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते, मार्मिक साप्ताहिकांमध्ये त्यांनी व्यंगचित्रकारिता केली होती.

प्रबोधनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या प्रबोधकांमध्ये सन्मानाचे स्थान असलेल्या ‘प्रबोधनकार ठाकरे‘ यांच्या घरी बाळ केशव ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारीला झाला. प्रबोधनकारांनी आपल्या लेख आणि पुस्तकातून महाराष्ट्रातील मराठी माणसाला एक नवीन जाग दिली होती. ते संस्कार लहानग्या बाळवर लहानपणापासून होत होते. बाळासाहेबांनीच एकदा आपल्या वडिलांची आठवण सांगितली होती, की वडिलांना भेटायला अनेक मोठमोठी माणसे यायची. एकदा दरवाज्यात पडलेल्या चपलांच्या ढिगांकडे पाहून प्रबोधनकार बाळला म्हणाले होते, बाळ, चपलांचा ढीग हीच आपली खरी संपत्ती आहे, ती तू आयुष्यभर जप. पुढे बाळासाहेबांशी असलेल्या विविधांगी क्षेत्रातील लोकांचा सलोखा आणि बाळासाहेबांचा माणसांचा व्यासंग पहिला, तर बाळासाहेब वडिलांच्या शब्दाला तंतोतंत जपले असे म्हणता येते.वडिलांकडून अजूनही काही गुण बाळासाहेबांनी उचलले, ज्यांनी त्यांचे आणि पर्यायाने शिवसेनेचे व्यक्तिमत्व घडले- पुरोगामीत्व, जातीपातीपलीकडे पाहण्याची वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमकपणा!

बाळासाहेबांचा पहिला विचार एक कलाकार म्हणूनच करावा लागतो. बाळासाहेब उत्कृष्ट व्यंगचित्रकार होतेच. एक व्यंगचित्रकार  म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय प्रश्र्नांवर, उणिवांवर तिखट भाष्य करण्यास तात्यांनी सुरुवात केली. १९५० मध्ये आधी ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये ते काम करीत, पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.

पुढे फ्री प्रेस जर्नल सोडून त्यांनी १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे इतके मार्मिक नाव प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक आहे. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते . तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बाळासाहेबांसारख्या आक्रमक व्यंगचित्रकाराला प्रचंड अनुकूल होती. संयुक्त महाराष्ट्र चा लढा नुकताच होऊन गेला होता, त्यामुळे महाराष्ट्रमंडळींमध्ये प्रचंड उत्साह होता, अंगात रग  होतीच पण त्याला विजयाची जोड मिळाल्याने आत्मविश्वासही फुरफुरत होता. दुसरीकडे या विजयला बेळगाव निपाणी कारवारसह खूप मोठा भूभाग कर्नाटकमध्येच असल्याची दुखरी किनारही होती. स्वातंत्र्यानंतर सर्वच आलबेल नव्हते. महाराष्ट्रात प्रकर्षाने मराठी तरुणांचे काही प्रश्न अपूर्ण होते, मुंबईत मराठी माणसावर होत असलेला अन्याय पाहून मराठी मन खदखदत होतेच   आणि राजकारण्यांचे तिकडे अक्षम्य दुर्लक्ष होत होते. या सर्व परिस्थितीचा अचूक वेध घेण्याचे टायमिंग बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये साधले, त्यातूनच शिवसेना ही मोठी राजकीय चळवळ उभी राहिली. एकीकडे तरुणांची खदखद टिपून त्यांचे रक्त पेटवणारे बाळासाहेब लहान मुलांसाठीच्या “श्‍याम‘ या पाक्षिकाचेही संपादक होते. तिथे ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.

मार्मिकने महाराष्ट्रात एक चळवळीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला. आता ही पेटलेली ऊर्जा फक्त चित्रांमध्ये अडकून चालणार नाही ती संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार प्रबोधनकारांनी आणि बाळासाहेबांनी केला. प्रबोधनकारांनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? आणि १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेने’ची स्थापना केली. हे नावही प्रबोधनकारांनीच ठेवले होते.  शिवसेनेच्या वाढीचे योग्य वातावरण त्याकाळी होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर मराठी तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला होता. बाहेरच्यांची अरेरावी वाढू लागली होती.  नोकऱ्या आणि उद्योग त्यांच्याच हाती होते. शिवसेनेचा पहिला मेळावा दसऱ्याला ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कच्या मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवरील प्रचंड गर्दी याचे सूत्र जुळले.

व्यंगचित्रकारितेतून आलेले आणि महाराष्ट्रदेशी रुजवलेले मराठी प्रेमाचे आणि राष्ट्रप्रेमाचे झाड वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखनातूनही जोपासले जावे, शिवसेनेचे विचार पसरवण्यासाठी स्वतःचे एक मुखपत्र असावे असं विचार करून बाळासाहेबांनी “सामना” ह्या वृत्तपत्राची सुरुवात केली. आतापर्यंत चित्रातून येत असलेले झणझणीत तिखट आता शब्दातूनही येऊ लागले.

शिवसेना शाखाशाखांमधून मराठी माणसाच्या घरात पोहोचत होती, निवडणुकांमधून महानगरपालिकेतही. भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांनी शिवसेना-भाजप युतीचा पाया घातला. देशात भाजप मोठा भाऊ आणि राज्यात शिवसेना अशा सूत्राने ही सुरुवात झाली . १९९५ मध्ये या युतीच्या निर्णयाला राज्याच्या शासनाचे गोड फळ मिळाले. याचे वर्णन बाळासाहेबांनीच शिवशाही असे केले होते. मनोहर जोशी या सत्तेचे मुख्यमंत्री बनले.

मराठी माणसासाठी सुरु झालेल्या शिवसेनेने पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परखड मते मांडण्यास सुरुवात केली. या देशाला “यापुढे फक्त आणि फक्त हिंदुस्थानच म्हणा’, “जसे ते एकत्र येतात तसे आपणही एकत्र आले पाहिजे”,  “गर्व से कहो हम हिंदू है” अशा विधानांनी मराठी हिंदू प्रभावित झाला. १९९३ची दंगल, बाँबस्फोट, बाबरी मशीद प्रकरण, पाकिस्तानविरुद्ध परखड मते आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या कार्यक्रमांना तीव्र विरोध, आतंकवाद्यांविरुद्ध मते त्यातून शिवसेनेचा हिंदुत्व विचार पसरत गेला, आणि केवळ महाराष्ट्रानेच नाही देशातील हिंदुत्वाच्या राजकारणानेसुद्धा त्याची गंभीर दखल घेतली.  मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये अर्थात भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला विरोध नाही असे मुस्लिमांबद्दलचे विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर ठेवले. या भूमिकेमुळे ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून त्यांना संबोधले जाऊ लागले. याआधी स्वा. सावरकरांना जनतेने हिंदुहृदयसम्राट हि उपाधी बहाल केली आहे.

एक राजकारणी म्हणून त्यांचे  वेगळेपण ठळक दिसून येते. सर्व राजकारण्यांशी त्यांचा असलेला संबंध, आपल्या शासनात कुठे काय घडते आहे ह्यासाठी अनेक वृत्तपत्र वाचून संबंधित शिवसेनेच्या नेत्यांना दिलेले आदेश, सामान्य तरूणातून घडवलेले राजकीय नेतृत्व, आणि महाराष्ट्रातील आणि देशातील कलाकारांशी, साहित्यिकांशी असलेले संबंध यामुळे बाळासाहेब हे रसायन महाराष्ट्राला भावले. त्यांचे आणि शिवसेनेचे विरोधक सुद्धा त्यांच्याबद्दल अनुद्गार काढत नाहीत ते या गुणवैशिष्ट्यांमुळेच!

१७ नोव्हेंबर,२०१२ मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले, त्यानंतर रस्त्यावर आलेल्या शोकाकुल शिवसैनिकांनी आणि जनसामान्यांनी त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी असलेल्या आदराची पावतीच दिली होती.

 

Previous Article

२३ जानेवारी

Next Article

चिं.वि. जोशी

You may also like