बालक, पालक आणि शिक्षक – डॉ. मो. शकील जाफरी

Author: Share:

हल्लीची पिढी एकीकडे विशेष बौद्धिक क्षमतेने परिपक्व दिसत असली तरिही मानसिकतेच्या बाबतीत मात्र हळव्या मनाची झाल्याचे दिसते. अगदी लहान सहान कारणांसाठी मरायला आणि मारायला तयार दिसणाऱ्या या मुलांच्या मानसिकतेचा बोध आणि शोध समाज विशेष करून पालक आणि शिक्षक वर्गाला करून घेणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनलेला आहे. पूर्वी शिकवण्यासाठी आणि मुलांना शिस्तीत ठेवण्यासाठी छडी छम – छम वाजवणे ही अत्यंत गरजेची बाब होती पण हल्ली अगदी प्रेम व आपुलकीने विद्यार्थ्यांना जिंकण्याची कला ज्या शिक्षकात नाही त्या शिक्षकाने शिक्षकी पेशा सोडून दिलेला बरा !

शिक्षक आणि पालक यांनी आपली पसंत ना पसंत मुलांवर लादण्यापेक्षा मुलांच्या आवडी – निवडीला महत्व देणे अति महत्त्वाचे ठरेल. मुलांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना शोधून त्यानुसार भविष्याची आखणी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे. मेरीट मार्क्सची अपेक्षा न करता मुलांच्या मानसिक स्थितीचाही विचार करणे अती महत्वाचे आहे.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


अनुशासन आणि शिस्त जर कोणालाही आवडत नसले तरीही जीवनाचा सूर सापडण्याकरिता शिस्त अथवा अनुशासन जरुरीचे आहे ही गोष्ट कोणीही विसरता कामा नये. ज्या प्रमाणे पतंग आकाशात उंच भरारी घेण्यासाठी दोरीचे बंधन जरुरी आहे आणि विणेचे तार सैल सोडले किंवा जास्त ताणले तरीही सुमधुर सूर निघणार नाही त्याच प्रमाणे शिस्त आणि अनुशासन विरहित जीवनात ही यशाची अपेक्षा निरर्थकच ठरेल. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

बाळ मनावर केलेल्या संस्कार पूर्ण जीवनात अती महत्वाचे भूमिका निभावतात म्हणून लहानपणापासूनच चांगले विचार मनावर बिंबविण्याची नितांत गरज आहे. प्रेषित मोहम्मद साहेब स्वल्लेल्लाहू अलैही व आलेही व सल्लम यांचे पहिले उत्तराधिकारी इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम यांच्या म्हणण्याप्रमाणे ” लहान मुलांचे मन हे सुपीक जमिनी सारखे असते यात पेरलेल्या विचार बिया वटवृक्ष होतात म्हणून चांगले विचार पेरावे.”

सहनशक्तीची कमतरता आणि आक्रमक भूमिका आत्ताची पिढी म्हणजेच किशोर, तरुण आणि युवकांच्या रक्तात भिनलेली दिसते. बालपणापासूनच हल्लीची पिढी पूर्वीपेक्षा जास्त भावनात्मक जगात वावरताना दिसते. किरकोळ कारणावरून चिडून शिक्षक, सह- विद्यार्थी किंवा प्रेमिकेवर हल्ला करण्याची घटना मनाला व्याकूळ करणारी आहे. पण खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की ज्या मुलांना प्रेम मिळत नाही अशा मुलांकडूनच असे कृत्य जास्त होतात म्हणून आपल्या मुलांवर भर – भरून प्रेम करायला हवे. त्यांच्या भाव – भावनाना समजून घेण्याची नितांत गरज आहे. प्रेमा बरोबरच त्यांच्या मान – सन्मानाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
आज – काल टीव्ही, मोबाईल, वॉट्सअप्प, इंटरनेट आणि फेसबुक या सारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यांचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे.

सुख सुविधांची मनो कामना, माणसाची गरज आणि त्या गरजेच्या पूर्तीसाठी अस्थित्वात असणारी साधने बदलत्या काळानुसार बदलत असतात. यात काय गैर ही नाही. पण दुर्दैवाने माणसे आज गरजांपेक्षा जास्त इच्छा अपेक्षांना महत्व देत आहे. मग सहजिकच अपेक्षांच्या पूर्तीसाठी वाम मार्गाचा अनुसरण शेवटी दुःख दायक ठरतच. इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम यांच्या म्हणण्यानुसार “गरजा भिकाऱ्यांच्याही पूर्ण होतात पण इच्छा आकांक्षा राजा महारांचेही पूर्ण होत नाहीत ” म्हणून गरज आणि अपेक्षा या मधला फरक समजून घेणे आणि मुलांनाही समजावणे गरजेचे आहे.

काही लोकांना मुलांचा समजूतदारपणा म्हणजे आगाऊपणा वाटत असतो हे चकीचे आहे. लहान वयातच मुल – मुली एवढे समजूतदार का याचा विचार केला तर लक्षात येईल की पूर्वी माणसाच्या सरासरी वयोमान शंभर वर्षे असे होते पण हल्ली साठ – पासष्ट वर्षाचेच आहे. म्हणजे पूर्वी माणसाला शंभर वर्षात जे काही करायचे होते ते हल्ली त्याला साठ – पासष्ट वर्षातच करावे लागेल. म्हनूनच पूर्वी वीस पंचविसाव्या वर्षी असलेली बुद्धीची परिपक्वता आज कालच्या दहा पंधरा वर्षाच्या मुला – मुलीत पाहायला मिळते.

सहजिकच वयोमान घटलेल्या या युगात ईश्वराने म्हणा किंवा प्रकृतीने म्हणा मानवजातीवर केलेला मोठा उपकार म्हणजे कमी वयात दिलेला जास्त समजूतदारपणा. खरं पाहता मानवजातीसाठी ईश्वराकडून दिल्या गेल्या या वरदानाचा योग्य वापर स्वतः साठी आणि समाजासाठी लाभदायकच आहे. पण यात वाईट काय असेल तर एवढेच की ईश्वराने म्हणा किंवा प्रकृतीने म्हणा दिलेल्या या अमूल्य वरदानाचे आपल्याकडून गैरवापर होत आहे.


“दर्जेदार शिक्षण असे देता येईल” हा लेख जरुर वाचा. या लिंकवर क्लिक करा: http://smartmaharashtra.online/better-education/


काही तथाकथीत विद्वानांच्या मते टीव्ही आणि मोबाईलचा वापराने हल्लीची नवी पिढी बिघडत आहे या निराधार बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात ते प्रश्न म्हणजे सीतेच्या अपहरण केलेल्या रावणाने कुठे टीव्ही आणि मोबाइल वापरला होता ? कौरव कोणता इंटरनेट पाहून बिघडले ? सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक काळात, समाजात चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही होते आणि प्रलयापर्यंत राहणारच. आपण कुठल्या गोष्टींचा अंगीकार करायला हवे हा महत्वाचा मुद्दा आहे. बुद्धीचा योग्य वापर माणसाला चांगल्या कृत्यांसाठी प्रवृत्त करतो आणि बुद्धीचा कुप्रयोग स्वतःला आणि समाजाला घातक ठरतो.

काहीतरी चांगल समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वढीलधाऱ्या वरीष्टांना काळ बदललय अस सांगणारी नवीन पिढीला एका वास्तविक गोष्टींचा विसर पडतो ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हे वरिष्ठ त्यांनी आपल्या पूर्वीच्या काळ ही पाहिलेला आहे (जो काळ आपण पाहिलेला नाही ) आणि आपल्या बरोबरचा आजचा काळ ही पाहत आहेत. म्हणून त्यांना तुम्हाला काय कळते असं म्हणणे म्हणजे वास्तवात आपल्याच अल्पबुद्धीचा प्रमाण असेल.

” गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर:
गुरू साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः “

म्हणणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकाला अनन्य महत्व आहे. शिक्षकांचा आदर सन्मान करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्त्वाचे शिक्षकांनीही आपली प्रतिष्ठा जपणे. पालक असो किंवा शिक्षक या दोघांचेही हल्लीच्या नवीन पिढी बरोबर पटत नसेल तर त्याचे मुख्य कारण एवढेच आहे की एकामेकांना समजून घेण्यात कमी पडणे आणि आपल्या अहंकाराला महत्त्व देणे !

शेवटी प्रेषित मोहम्मद साहेब स्वल्लेल्लाहू अलैही व आलेही व सल्लम यांचे पाहिले उत्तराधिकारी इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम यांच्या एक हदीस म्हणजेच कथनाने या चर्चेला विराम देऊ या. इमाम अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम म्हणतात ” पहिले सात वर्षे तुमचे अपत्य हे तुमचे मालक असून तुम्ही त्याचे गुलाम आहात. नंतरचे सात वर्षे तुम्ही मालक व्हा आणि त्यांच्या कडून कामे करवून घ्या. त्यानंतरचे सात वर्षे आपल्या मुलं – मुलींचे चांगले मित्र बना या नंतर त्यांना मंत्री किंवा सल्लागार बनवून घ्या ” हे उपरोक्त कथन ( योग्य आचरण ) पिढी पिढीतली दरी कमी करण्यात निश्चितच उपयोगी पडेल यात शंकाच नाही …

लेखक- डॉ. मो. शकील जाफरी (मंचर)
मो : 09867929589.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

नांदगाव-येथील महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Next Article

सायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांना “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड २०१८” चा किताब

You may also like