शेळ्यांची विक्रमी निर्यात

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) कार्गो विमानाद्वारे जिवंत शेळ्यांची भारतातील सर्वांत मोठी निर्यात ओझर विमानतळावरून झाली आहे. यंदाच्या हंगामात तब्बल ४५ हजार शेळ्या दुबईत विक्रीसाठी गेल्या आहेत. ओझरपाठोपाठ हैदराबाद आणि अमृतसरमधूनही शेळ्यांची निर्यात यंदा सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात शेळ्या निर्यातीचा उद्योग बहरण्याची चिन्हे आहेत.

सर्वसाधारणपणे समुद्रमार्गे आखाती देशात होणाऱ्या शेळ्यांच्या निर्यातीला फाटा देत गेल्या वर्षी ओझर विमानतळावरून कार्गो विमानाद्वारे निर्यात सुरू झाली. ही मुहूर्तमेढ निर्यात क्षेत्रासाठी अतिशय मोलाची ठरली आहे. गेल्या वर्षी आठ कार्गो विमानांद्वारे १३ ते १४ हजार शेळ्यांची निर्यात यशस्वी झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामात एक लाख शेळ्यांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. गेल्या चार जुलै रोजी या निर्यातीस प्रारंभ झाला. युक्रेनच्या आयएल ७० या विमानाद्वारे ही निर्यात करण्यात आली. सर्वसाधारणपणे एका विमानात १४०० च्या आसपास शेळ्यांची निर्यात होऊ शकली. यंदाच्या हंगामातील शेवटची निर्यात शुक्रवारी (१ सप्टेंबर) ओझर विमानतळावरून झाली. यंदा कार्गो विमानाच्या तब्बल ३४ फेऱ्यांद्वारे जवळपास ४५ हजार शेळ्यांची निर्यात झाली आहे. भारतातील ही आजवरची सर्वाधिक निर्यात आहे. तशी माहिती सानप अॅग्रो अॅनिमल्सचे संचालक हेमंत सानप यांनी थेट दुबईमधूनच ‘मटा’शी बोलताना दिली आहे. दुबईमध्ये शुक्रवारीच बकरी ईद साजरी करण्यात येत असल्याने तेथील बाजारात भारतीय आणि खासकरून नाशिकच्या शेळ्यांची विक्री सर्वाधिक होत असल्याचे सानप यांनी सांगितले.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), कार्गो कंपनी हॅलकॉन, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सोव्हिका लॉजिस्टिक प्रा. लि.तर्फे ही निर्यात झाली आहे. हवाई कार्गोद्वारे जिवंत शेळ्यांची धाडसी निर्यात यशस्वी ठरली असून, या पुढील काळात शेळ्यांबरोबरच इतर निर्यातीलाही चालना मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव

 

Previous Article

विसर्जन

Next Article

येऊ द्या मला या जगात

You may also like