गणेश दामोदर सावरकर तथा बाबाराव सावरकर

Author: Share:

जन्मदिन: १३ जून १८७९

स्मृतिदिन: १६ मार्च १९४५

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे नाव आहे. सावरकर घराण्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आपला वंश दिल्याचा अभिमानास्पद उल्लेख स्वातंत्र्यवीर वाहिनीस लिहिलेल्या पात्रातकरतात . या योगदानाचे पहिले पुष्प म्हणजे बाबाराव सावरकर!

बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल होते. बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते निष्णात होते. मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले लहानपणीपासूनच बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी जखडले होते. यात विषमज्वर नित्याचाच होता .

घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या पुढे जाऊ शकले नसले तरी  योगविद्या आणि वैद्यकशास्त्राविषयी त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यांच्याकडे गायन आणि सतार आणि तबला वादनाची कला होती.  इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, धर्म, तत्त्वज्ञान, कला इ. अनेक विषयांची पुस्तके होती यावरून त्यांचा व्यासंग समजून येऊ शकतो.

१८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. त्यांचा पत्‍नीचे नाव यशोदा होते. तात्यारावांसह सर्व त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांच्याविषयीचा आदर तात्यारावांच्या साहित्यात दिसून येतो.

तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते.

बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.

२० जुलै १९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार – होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.

२८ फेब्रुवारी १९०९ रोजी मुंबईत बाबारावांना अटक करण्यात आली.चौकशीअंती बाबांच्या घरी बर्‍याच आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची – काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली.

बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. अभिनव भारतावर पाळत ठेऊन असलेल्या कर्झन वायलीचा मदनलाल धिंग्राने १ जुलै १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी जॅक्सनचा वध २१ डिसेंबर १९०९ रोजी केला.

काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे कळविण्यात आले.

शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. १६ मार्च १९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.

बाबारावांचे साहित्य

राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनय या टोपणनावाने काशी येथे लिहिले, १९३४ साली प्रकाशन.

हिंदुराष्ट्र – पूर्वी-आता-पुढे

शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप

वीरा-रत्‍न-मंजुषा

ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

धर्म कशाला हवा ?

मोपल्यांचे बंड

वीर बैरागी: मूळ हिंदी भाषेतील पुस्तकावरून भाषांतरित केलेले पुस्तक

 

संदर्भ: मराठी विकिपीडीया

Previous Article

शिरवळ लेणी

Next Article

१६ मार्च 

You may also like