‘बबन’ चं भाऊराव कऱ्हाडे यांस पत्र

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


मा. दिग्दर्शक
भाऊराव कऱ्हाडे (बेंद्रेवाडीचे बैजू बेंद्रे पाटील!)

बबन चा तुम्हाला साष्टांग नमस्कार,

सुरवातीलाच तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, तुमच्याच पिच्चरमधला बबन तुम्हाला कशाला पत्र लिहिलं ? पण मी तुमच्या पिच्चर मधला नसलो तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील अन प्रत्येक गावातील आहे. त्या सर्वांच्या वतीने मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. तुमच्या पिच्चर मधला “बबन” हा आम्हा सर्व बबनचं प्रतिनिधित्व करतोय, याआधी अस आम्हाला कधी पाहायला मिळालं नव्हत. आम्हा सर्वांना त्याच्यामार्फत तुम्ही पडद्यावर दाखवलं , त्याबद्दल मन:पूर्वक आभार.

माझी ओळख सांगता-सांगता महत्त्वाच बोलायचं राहीलच कि. पत्र लिहिण्यास कारण कि, मी तुमच्याशी या पत्राद्वारे काही मुद्द्यांवर बोलू इच्छितो. (तुम्ही सध्या खूप व्यस्त असता म्हणून पत्राद्वारे हा सगळा खटाटोप.) पहिल म्हणजे ‘बबन’ ने चौथ्या आठवड्यात दमदार एन्ट्री केलीये आणि अजूनही संपूर्ण महाराष्ट्रभर हाउसफुल आहे. गुंजन सिनेमा, नाव्हरे येथे तर सलग १०० शो हाउसफुल झाले. याबद्दल तुमचे व टीमचे खूप-खूप अभिनंदन.

अगोदरच मी उल्लेख केला कि तुम्ही आमच्या सारख्या बबन ला पडद्यावर दाखवलत. अगदी त्याच्याप्रमाणेच आमची देखील स्वप्ने आहेत मोठ होण्याची, बक्कळ नसला तरी चालेल पण ती पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्याइतका पैसा कमवायचा आहे. पण आभ्यासारखी अन नाना-दादा सारखी (तसेच चेअरमन), गावगुंड म्हणा किंवा पुढारी, ती आम्हाला नाही मोठी होऊ देत. कारण आम्ही मोठे झालेलो त्यांना चालणार नाहीये. त्या सर्वांच्या मनात भीती आहे कि, बबन सारखी माणस मोठी झाली तर यांच्या सत्तेला सुरुंग लावतील. प्रत्येक गावातील बबन यांच्या भीतीमुळे दडपला जातोय, स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतला जातोय (निवडणुकीच्या वेळी १ मतामाघे १००० रुपये असा रेट आहे काहीतरी, वर भत्ता वेगळाच), काही ठिकाणी तर तो मारला जातोय (नगर जिल्हा त्यासाठी तर सध्या गाजतोय), प्रत्येक गावागावात हीच परिस्थिती. पण प्रस्थापितांना कळणार कधी, मी माझी स्वप्ने पुर्ण करण्यासाठी कष्ट करून पैसा कमावतोय, फुकटच कुणाच खात नाहीये. पण मग मी जेव्हा कंपनीत दुध घालायला जातो तेव्हा हे अशी विचारपूस करतात कि, जशी काय कंपनी यांच्या बापाची आहे ? (लिहिताना अनावर झालेला राग !)

Bollywood घ्या किंवा Hollywood, तो हिरो ५०-१०० लोकांना मारतो, तरी हिरोला साध खरचटत सुद्धा नाही. पण तुम्ही तर कमाल च केली. आधी हिरोला माळरानातून पळवला, नंतर चड्डीत मुतुस्तवर मार खायला लावला. विलन ला गोळीसुद्धा हिरोईनेच (कोमल ने) मारली. हिरो मात्र पळून गेला नंतर. काही पण दाखवता राव तुम्ही. म्हणजे आम्ही येडे, आस कुठ असतं व्हय ? पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर तुम्ही वास्तविक परिस्थिती समोर मांडलीये. परिस्थिती हाताबाहेर असेल तर पळून जाण्यात धन्यता मांडणारा बबन दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा दुधाच्या किटलीनेच गुंडांना मारतो तेव्हा छाती अभिमानाने भरून आली बर आमची. नुसता मार खाणारा बबन नाहीये आमचा, वेळप्रसंगी मार देणारा सुद्धा तो आहे. नाही पांडामामानी गाडी दिली म्हणून काय झाल, ज्याच्या मुलाला आमच्या बबन ने फुकटात दुध दिल त्याने तर केली नव्ह मदत. आम्ही भोळी मानस हो, दुधाचे उपकार कस विसरणार ? असो. तुम्ही दाखवलेला आमचा बबन आहेच लई टेरर. बबन खडा तो साला सरकार से भी बडा !!!

शहारुख सारखे हात पसरवून, सलमान सारखी बॉडी करून, हृतिक सारखा डान्स करून (अजून आहेत बरीच नाव) पोरगी पटवलेली आम्ही पाहिली होती. पण साला, जी पोरगी आवडते (कोमल), आधी तिच्याबद्दलच मित्राकडे विचारपूस करायची कि, ती कोमल आली आसन कार ? आणि जेव्हा ती समोर येऊन धडकते, तेव्हा मात्र तिलाच बोलायचं. आस कुठ असतं व्हय ? अशान पोरगी पटण का राव कुणाला ? शहरातील मुली तर केस ठोकतील आमच्यावर. पण कोमल तशी नाही. सुरवातीला नाही म्हटली मात्र नंतर आमच्या बबन वर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम केल. असो. एक गोष्ट तरुण वयात होण स्वाभाविक आहे. कॉलेज ला एक मुलगी आवडत असताना गावाकड पण एक आवडत असती (पपी). पण जेव्हा दोन्हीपैकी एक निवडायची वेळ येते ना तेव्हा मनाचा कौल जिच्यावर खर प्रेम असतं ना, तिलाच मिळतो अन प्रेमाची निवडणूक सुद्धा तीच जिंकते.

निवडणुकीवरून आठवलं, तुम्ही तर सरपंचीन बाईला डाईरेक शेळ्या घेऊन जाताना दाखवलं राव. आमच्या सरपंचीन बाईला फक्त फ्लेक्स वर अन सह्या करण्यापुरत दाखऊन या लोकशाहीचे तुम्ही तर अगदी वाभाडे काढले हो. मानल पाहिजे राव तुम्हाला. अशी आहेच कि परिस्थिती प्रत्येक गावागावात. सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून ज्यांना सरपंच पदाची जागा आहे, त्यांनाच आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊन निवडून आणायचे (लोकांमधून सरपंच पदाची निवड, हा कायदा आत्ता आलाय, पण आधी मात्र तसंच होत की.) मी ऐकलंय भारत लवकरच महासत्ता होणार आहे म्हणे, हा असा ? काहीही झाल तरी सरपंच (मुंबईचा महापौर?) आपलाच पाहिजे, नाहीतर जनता काय म्हणल?

तुम्हालाच पत्र लिहायचं आणि तुमचाच उल्लेख नाही करायचा, आस कुठं असतं व्हय ? मी काय म्हणतोय, किती दारू प्यावी याला काही मर्यादा ? जमीन विकली दारूपायी आणि काम करायचं म्हटलं कि, लोळत असताना भर दिवसा कसं काय हिव वाजून येत तुम्हाला ? पोराचे कष्ट कसे काय नाही दिसत ? असुद्या, बाप तो बाप असतो. तुमच पोरग लई गुणी. तुम्ही १०० मागितले तर तो ५०० हातावर टेकवतो. काही काम पण करू देत नाही तुम्हाला. पण त्याच्याबद्दलची असणारी काळजी तुमच्या डोळ्यात दिसली बरं ! असा बाप आहेच कि प्रत्येक गावा-गावात अन खेड्या-खेड्यात. आमच्याकडे बबनच्या अभिनयापेक्षा तुमच्याच अभिनयाची जास्त चर्चा ! तुम्ही पडद्यावर दिसले आणि साधी हालचाल जरी केली तरी प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्या मारल्या ! मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा अभिनय पहिल्यांदा पहिला. तुम्ही अक्खा महाराष्ट्र हासून-हासून जार केलात. तुमच्या अभिनयाला २१ तोफांची सलामी !

ज्या दुधाला बबन ने स्वतःच सर्वस्व मानल, ज्या दुधासाठी रक्ताचं पाणी केल, त्याचं दुधात बबन चे रक्त वाहताना पाहून आमच्या काळजाचा ठोका चुकला. बबन ला मारायला नव्हत पाहिजे तुम्ही सिनेमात. काय चुकल होत त्याचं ? कष्ट करून पैसा कमवून मोठ व्हायची स्वप्ने बघितली हे चुकल कि प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवला हे चुकल ? तुम्ही बबन पिच्चरमध्ये मारला खरा, आमच ज्याने प्रतीनिधीतत्व केलं, त्याचा शेवट जरी रीळ लाइफ मध्ये झाला असला तरी रिअल लाइफ मध्ये त्याच्यासारखे हजारो बबन आमच्या गावाकडे उभे राहिलेत. आता ते कष्ट करून मोठे होतील, त्यांच्या पिल्लुसाठी घर बांधतील, बबन चे बबनराव होतील अन साहेब चे साहेबराव होतील. आणि हे सगळ शक्य होईल फक्त तुमच्यामुळे. कारण तुम्ही दाखवलेल्या पडद्यावरील बबनच्या संघर्षाने तरुणवर्गात एका संघर्षाची-नवचैतन्याची लाट तुम्ही निर्माण केलीयेत. आमच्या सारख्या सर्व बबन कडून आपले मन:पूर्वक आभार.

@ प्रा. विशाल पोपट पवार
( लेखक ATSS महाविद्यालय, चिंचवड, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत )
vishalpawar153@gmail.com

 


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग !

Next Article

उलटा चोर कोतवाल को दाटे

You may also like