औरंगजेबजींच्या बदनामीची केंद्रे

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


औरंगजेबजींच्या बदनामीची केंद्रे

आज आपण पर्श्या ते अर्चीकुमारी ( माफ करा शुद्धीत असलेल्या वाचकांनी पर्श्या ऐवजी पर्शिया ते कन्याकुमारी असे वाचावे ) प्रातःस्मरणीय असलेल्या “अल सुलतान अल आझम वल खाकान अल- मुकर्रम हजरत अबुल मुझफ्फर मुहय उद दिन मुहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर , बादशहा गाझी, शेहेनशाह ए सल्तनत उल हिंदीया वल मुघलीया” ( हुश्श ऽऽऽ) या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या महात्म्याचा जिवनप्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत.

विक्रम संवत्सर १४२० मार्गशिर्ष महिन्यात वैभवलक्ष्मीचे उद्यापन असलेल्या शुक्रवारी गोरज मुहूर्तावर हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरात येथील दाहोदमध्ये शाहजहान व मुमताज या मातापित्याच्या पोटी झाला. यानिमित्ताने आसेतुहिमाचल तिळगुळ वाटला गेला. ( तिळगुळ वाटण्याचा मनुवादी समारंभ येथूनच सुरु झाला ) औरंगजेबजींना चार माता, तीन बंधु आणि चार भगीनी, हजारो नोकरचाकर , लाखोंच सैन्यदल , कित्येक कोट होनांचा मुलूख असा भलामोठा कुटुंबकबीला जन्मजात लाभलेला होता. परंतु दुर्दैवाने बाल औरंगजेबजींवर मातृवियोगाच्या स्वरूपात कळीकाळाचा घाला पडला.

औरंगजेबजींच्या पिताश्रींना हा धक्का सहन झाला नाही. औरंगजेबजींचे पिता शाहजहान हे स्वतः सिव्हील इंजिनिअरिंग क्षेत्रातील सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी होते. त्यांनी आपल्या कैलासवासी पत्नीच्या स्मृतीप्रीत्यर्थ संजय खान, फिरोज खान या मायावीनगरीतील मयासुरांना बोलवुन ताजमहालच्या निर्मितीचे आदेश दिले. त्यासाठी तातडीने अब्जावधी रूपयांचा निधी मंजूर केला.

तर इकडे बाल औरंगजेबजींनी मातृवियोगाचे दुःख विसरण्यासाठी गीता रामायण पंचतंत्र चांदोबा आदी धार्मिक साहित्यात स्वतःला बुडवून घेतले. बाल औरंगजेबजींच्या बौद्धीक व अध्यात्मिक बैठकीचा पाया पक्का व्हायला सुरुवात झाली ती इथे.

पुढे कालांतराने औरंगजेबजींना दख्खनची सुबेदारी मिळाली. एक सुबेदार म्हणून त्यांना महाराष्ट्राची पहिल्यांदा ओळख झाली. संतमहंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीने त्यांना अक्षरशः भुरळ घातली म्हटले तरी ते वावगं ठरणार नाही. स्नानसंध्या करुन शुचीर्भुत शरीराने कधी दुर्जन गडावर जाऊन रामदासजींचे ( आठवले गट ) पाय चुरावेत आदी कर्मकांड करीत एका धर्मपरायण भक्ताची भुमिका निभवावी. तर दुसरीकडे गोरगरीब जनतेला शेतसारा माफ करावा, त्यांना मोफत गायबैल वाटावेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात आदी आदर्श शासकाची भुमिका निभवावी इ. कर्तव्य पार पाडावीत असा परिपाठ सुरू ठेवला. खरेतर त्यांचे मन कधीही रूक्ष राजकारणात रमत नव्हतेच . उदाहरणार्थ एका अशाच प्रसंगी सर्व राजवेष टाकून हिरवी कफनी अंगावर चढवून सन्यास घ्यावा असा मनोदय त्यांनी रामदासजींपुढे मांडला परंतु रामदासजींनी ” तुम्ही लाखांचे पोशींदे, तुम्ही तुमचा राजधर्म सांभाळावा व आम्ही आमचं काव्य सांभाळावं हेच धर्माला धरुन आहे ” असा उपदेश केला व त्यांचे मन वळविले.

दुसरीकडे शाहजहानजींची प्रकृती वयोमानामुळे ढासळली. हे वृत्त पावताच शाह शुजा व दारा शिकोह यांनी कपटनीतीचा अवलंब करुन स्वतःला पदपातशहा घोषित केले. राजसत्तेसाठी भाऊ भावाचा वैरी झाला, एकमेकांच्या जीवावर उठला. हजारो लोक युद्धात मृत्युमुखी पडले. हि वार्ता दख्खनेत औरंगजेबजींना कळाली. अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी दिल्ली कडे कुच केली. राजसत्तेसाठी एकमेकांचे शिरकाण करणाऱ्या भावांची होणारी धुळधाण त्यांनी महाभारतात वाचली होती त्यामुळे त्यांनी सत्य व अहिंसा या मार्गांचा अवलंब करत रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले.

त्या उपोषणाला दिल्लीचा कोतवाल हरीश्चंद्र खुजलीवाल, माजी जेलर पुजा बेदी, अखिल भारतीय गोरक्षक दलाचे कालू यादव आदी वजनदार मंडळींनी पाठिंबा दिला. हळूहळू संपूर्ण दिल्लीत या उपोषणाची चर्चा सुरू झाली. झी न्युज , आजतक, रिपब्लिकन टिव्ही सगळे सगळे झाडून रामलीला मैदानावर लोटले. Nation wants to know म्हणत अर्णबने संपूर्ण स्टुडीओत आरडाओरडा सुरू केला , खबीश कुमारने दारा शुकोह, शाह शुजाला ” बुडबक, कौन जात हो ” असं विचारून हैराण करुन सोडले. मराठी मिडीयाने नेहमीप्रमाणे दिल्ली मिडीयाचे शेपूट पकडून सुमार मोहम्मद खडूस , सुमार केतकर, सुमार सप्तर्षी आदी रिकामचोट गोळा करुन चर्चांच्या महाचर्चा घडवून आणल्या. आणि शेवटी …….

या सगळ्या लोकआंदोलनाचा परिणाम म्हणुन एके दिवशी नैतिक पराभव स्विकारत दारा शुकोहने स्वतःला फाशी लावून आत्महत्या केली, शाह शुजा म्यानमारला रोहिंग्या मुसलमान बनुन आंग सु कि च्या आश्रयाला पळाला तर शाहजहानने स्वतःलाच राजमहालात स्थानबद्ध करून घेतले. अशा तर्हेने सत्य व अहिंसेच्या बळावर दिल्लीपती बनण्याचा राजमार्ग औरंगजेबजींनी समस्त जगाला घालुन दिला असे म्हणण्यास हरकत नाही.

दिल्ली हस्तगत झाल्या झाल्या औरंगजेबजींनी काशीहुन गागाभट्टांना पाचारण केले व स्वतःला विधीवत राज्यभिषेक करवून घेतला. अडचण नको म्हणुन नंतर रामदासजींच्या सल्ल्यानुसार पशुपतीनाथाच्या चरणी रिपब्लिकन शाक्त पद्धतीने देखिल राज्यभिषेक करवून घेतला. या मंगल प्रसंगी रामदासजींनी रचलेले एक काव्य फार सुप्रसिद्ध आहे. (अब आप सुन रहे है लता कि आवाज मै)

” स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेचि होतसे । हिंडता फिरता गेलो । संसदवनभूवनी ॥ विघ्नांच्या उठिल्या फौजा । भीम त्यावरी लोटला । घर्डिली, चिर्डिली रागे । संसदवनभूवनी ॥ खौळले लोक देवांचे । मुख्य देवचि उठिला । कळेना काय रे होते । संसदवनभूवनी ॥ बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला । संसदवनभूवनी ॥ त्रैलोक्य गांजिले मागे । विवेकी ठाउके जना । कैपक्ष घेतला रामे रहिमे । संसदवनभूवनी ॥ बुडाला दारा शुकोह पापी । शुद्र संहार जाहला । मोडिली मांडिली क्षेत्रे । संसदवनभूवनी ॥ उदंड जाहले पाणी । स्नान संध्या करावया । जप-तप-अनुष्ठाने । संसदवनभूवनी ॥ रामरहीमवरदायिनी माता । गर्द घेउनी ऊठिली । मर्दिले पूर्वीचे पापी । संसदवनभूवनी ॥ भक्तांसि रक्षिले मागे । आताहि रक्षिते पहा । भक्तांसि दीधले सर्व । संसदवनभूवनी ॥”

होता होईतो राज्याची घडी बसली. औरंगजेबजींनी रामदासजींच्या आदेशानुसार राज्यकारभाराचा पाया मनुस्मृतीवर आधारित ठेवला. शाहजहानच्या काळातील मुल्ला मौलवींना चांदणी चौकात फाशी देऊन ( मनुस्मृतीनुसार ) त्यांच्या जागी तुंदीलतनु पंडे, भटजींची नेमणुक केली. राज्यात चातुर्वण्य पुन्हा सुरू झाल्यामुळे जनतेला आनंदीआनंद झाला.

पण नियतीला हे सुख बघावे कसे ? …….

@तुषार दामगुडे

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

१ टक्का अब्जाधीश  भारतीयांकडे देशाचे ७३% उत्पन्न:  ऑक्सफॅमचा आर्थिक विषमता दाखवणारा डोळ्यात अंजन घालणारा रिपोर्ट 

Next Article

ग्रामपंचायतींना मिळणार स्वत:ची इमारत: बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मान्यता

You may also like