Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आता “हेराम” करण्याशिवाय पर्याय नाही !: डॉ. शांताराम कारंडे

Author: Share:

आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान म्हटलं की आपसूकच शेतकरी आला. कारण शेतकाऱ्याशिवाय शेती होऊच शकत नाही. त्यामुळेच आपल्या देशात शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते. परंतु त्याच जगाच्या पोशिंद्याला आज सरकारच्या मेहेरबानीची आवशक्यता भासते. जरा शेतकऱ्यांसाठी काही करायची वेळ आली की सरकार शंभर वेळा विचार करते. शेतकऱ्यासाठी एखादा निर्णय घ्यावयाचा असेल तर अटी आणि शर्ती आडव्या येतात. त्या अटी शिथील केल्याने जगाच्या या पोशिंद्याला दोन पैसे जास्त मिळाले तर सरकारचे बिघडते कुठे ?

प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की या सरकारला नको त्या अटी व नको ते निकष आठवतात. जणू या सरकारला अटी अन् निकषांचा ‘व्हायरस’ लागला आहे. त्यामुळे निश्चितच  भविष्यात प्रत्येक निवडणुकीत शेतकरी हा केंद्रबिंदू असेल. शेतकऱ्यांनी जर  ‘फॉरमॅट’ मारून सरकारच ‘डिलीट’ केले तर शंभर टक्के येणारे सरकार पन्नास वेळा विचार केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवरून कोणत्याही सरकारला विरोधकांनी धारेवर धरताना म्हटले जाते की, तूर भावांतर योजनेचे पैसे असो, बोंडअळीचे पैसे असो, शेतकरी कर्जमाफी असो, किंवा दुष्काळचा प्रश्न असो, दरवेळी फक्त शेतकऱ्यांनाच नाहक अटी व अर्थहीन निकष पूर्ण करण्याची सक्ती केली जाते. हे निकष इतके कठोर असतात की, शेतकऱ्यांसाठी निकष आहेत की निकषांसाठी शेतकरी आहेत? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

देशातील गरीब बिचारा शेतकरी असो त्याच्या शेतात पिकांसाठी लावलेल्या पाणी ओढणाऱ्या मोटारींच्या विजेचे बिल नुकसानामुळे त्याला भरता आले नाही तर वीज वितरण करणारे कर्मचारी पुढचा मागचा विचार न करता सरळ लाईट कापतात. तर करोडो रुपयांना चुना लावणारे विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे अनेक जण सरकारच्या सर्व नियम-कायद्यांना बगल देत हजारो कोटी रूपये घेऊन पळून जातात. त्यांचे मात्र या सरकारला काहीही करता आले नाही किंवा काहीही करता येत नाही. पण शेतकरी मात्र यांच्या डोळ्यात खुपतो.

सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या सरकारची तुलना रझाकारांशी केली तर अतिशयोक्ती होणार नाही. पूर्वी इंग्रजांनी आणि त्यानंतर रझाकारांनी मराठवाड्यावर प्रचंड जुलूम, अन्याय, अत्याचार केला. तसाच जुलूम, अन्याय आणि अत्याचार आज भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून मराठवाड्यावर अन् संपूर्ण देशावर सुरू आहे. शेतकऱ्यांप्रती या सरकारचा कळवळा १० टक्केही खरा नाही. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या आणि तशी वेळ आली तर सपशेल घुमजावो करायचे. सध्या तर जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेराही धोक्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात घेतलेल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांचे सगळे कर्ज सरकारने सरसकट माफ करायलाच हवे अशी परिस्थिती आली असताना हे सरकार त्याकडे डोळेझाक करूच कसे शकते ?

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात दुष्काळ ‘सदृश्य’ असला तरी तिथला पालकमंत्री मात्र ‘अदृश्य’ आहे, हे कटुसत्य नाकारता  येत नाही. एखादा संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला असताना देखील तेथील पालकमंत्र्यांना दुष्काळाची साधी पाहणी करायला सुद्धा वेळ काढता येत नाही. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा मात्र प्रत्येक राजकीय पक्ष करीत असतो परंतु तसे करताना कुणी दिसत नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत फक्त जेवायला,  खायला जातात का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. येत्या निवडणुकीत सध्याच्या सत्ताधारी पक्षांना भविष्यात त्यांच्या कर्मामुळे पराभव दिसू लागल्याने भाजप-शिवसेनेने आता मध्येच राम मंदिराचा मुद्दा काढला आहे. रामाच्या नावावर लोक पुन्हा आपल्यालाच मतदान करणार, असा त्यांचा गोड गैरसमज आहे. पण आता जनता यांना भुलणार नाही. आयुष्यभर पाप करून शेवटच्या दिवशी पुण्य केले म्हणून कोणाला स्वर्ग मिळत नसतो. तसेच भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मागील चार वर्षात विकास दिसला नाही. अच्छे दिन आले नाहीत. १५ लाख रूपये मिळाले नाहीत. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले नाही. पाकिस्तानला धडा शिकवला नाही. त्यामुळे या देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील नागरिक पुन्हा यांच्यावर विश्वास ठेवाणार नाहीत. म्हणूनच देशासमोरील सर्व समस्या सोडून हे सरकार निवडणुकीच्या तोंडावर राम-राम करायला लागले आहे. अशा फसव्या सरकारला आता आपण कायमचा ‘आराम’ दिला पाहिजे, म्हणजे ह्या सरकारला भविष्यात “हेराम” केल्याशिवाय पर्यायच नसेल.

Previous Article

पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’- एड. हरिदास उंबरकर

Next Article

“जंगल नाही, स्वर्गच जणू”: भीमाशंकर

You may also like