पुस्तक परिचय; आसमंत

Author: Share:

आसमंत हे श्रीकांत इंगळहळीकरांनी लिहिलेलं एक उत्तम पुस्तक, सच्च्या निसर्ग प्रेमींनी आवर्जून वाचाव असंच आहे. स्वानुभवावर आधारित इतकं सच्च लेखन क्वचितच वाचायला मिळतं. इंगळहळीकरांच्या या पुस्तकाला निसर्ग ऋषी मारूती चितमपल्लींची प्रस्तावना आहे. प्रस्तावना वाचतानाचं पुस्तकाबद्दलच कुतुहल जागृत होतं जातं. पुढे इंगळहळीकरांच मनोगत वाचताना ते वाढीस लागतं आणि दर प्रकरणागणिक  मिळणार्या संपन्न अनुभवाने हा आलेख चढताच रहातो. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शक्ती हे लिखाणाचं खरं बलस्थान आहे. त्याचबरोबर लेखकाच्या चित्रदर्शी शैलीची त्याला जोड मिळाल्यामुळे प्रत्येक लेख हा अगदी मनस्वी होतो. बाळपणी अनुभवलेला निसर्ग पहिल्या प्रकरणात उलगडत असला तरी पुढच्या सगळ्या उठाठेवीची साक्ष तो देऊन जातो.

सृष्टीत घडणारे छोटे छोटे बदल हे किती महत्वाचे असतात एवढचं नाही तर ते बदलणार्‍या पर्यावरणाचे संकेत कसे देतात हे मांडताना लेखक वाचकाला नकळत एक सूक्ष्म अवलोकनाची दृष्टी देऊन जातो. ज्याच्या जोरावर वाचनाची गोडी वाढते.या पुस्तकात एकंदर एकवीस प्रकरण आहेत. त्यातील साप पकडण्याचा पराक्रम आणि त्यातून उद्भवलेला प्रसंग तर मुळातूनच वाचण्या सारखा आहे. कोकिळेचं बाळ वाढवणारा भाबडा पक्षी आणि उंचावर घरटं बांधणारा ससाणा दोघेही आपल्याला सारखेच मोहवतात. कास पठाराचं पुष्पवैभव, कंदिलपुष्पाची कहाणी वाचकाला गुंतवून ठेवते. बहाव्याच्या संगतीत फुललेल पक्षी जीवन आणि बांडगुळा सारख्या दुर्लक्षित वनस्पतीचे सौंदर्य लेखक लिलया उलगडून दाखवतो.

नुसतं निसर्ग निरीक्षण न नोंदवता लेखकाने स्वतः केलेले पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अधिक ठळकपणे पुढे येतात. लेखकाने घेतलेल्या   शेताचे त्यात निसर्गाशी  इमान राखत केलेल्या शेतीचे अनुभव मुळातूनच वाचावे असे आहेत. हा अनुभव वाचताना ‘देतो तो देव आणि राखतो तो राक्षस’ ही विनोबांच्या आईने दिलेली शिकवण चटकन आठवून जाते. पक्षांनी आणि किटकांनी खाऊन उरलेला वाटा समाधानाने स्वीकारण्याची लेखकाची वृत्ती अगदी पुर्णत्वाने पटते. परंपरेने चालत आलेल्या शेतीतील रिवाजांना दूर सारून स्वतःच्या निरीक्षणांवर, विज्ञानावर आणि मुख्य म्हणजे निसर्ग नियमात ढवळा ढवळ न करता आपली शेती यशस्वी करून दाखवणारा लेखकाचा प्रयत्न खुप पटतोही.

खारफुटी सारख्या दुर्लक्षित वनांची अगदी उपयुक्त आणि विज्ञाननिष्ठ माहिती या पुस्तकात मिळते. या तिवरांच्या जंगलाची आेळख करून देताना बरीचशी शास्त्रीय माहिती, वनस्पतींची नावं, कुळ असा तपशील लेखक पुरवतो पण तरीही हा भाग कुठेही क्लिष्ट होतं नाही. .अतिशय सोपे रंजक पण सच्चे लिखाण वाचल्याचा आनंद पदोपदी मिळतो. अलिबाग जवळील तळ्यातील कमळांचे वर्णन तर बहारदार उतरले आहे. कमळ या परिपूर्ण वनस्पतीचं  वर्णन करताना अनेक प्राचीन संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळे कमळा बद्दल ची उत्सुकता वाढीला लागते आणि  अलिबागला गेल्यावर या तळ्याला नक्की भेट द्यायची असा वाचकाचा निर्णय होऊनच जातो. या लेखासोबत दिलेल देखण्या सुवर्ण कमळाचं छायाचित्र तर अप्रतिम असच आहे. पण त्याबद्दल अधिक खुलासा जर लेखकाने केला असता तर बर झालं असतं कारण अशा पद्धतीचं पिवळ कमळ भारतात सहसा दिसत नाही. प्रामुख्याने गुलाबी आणि पांढरी म्हणजे पुंडरीक कमळं भारतात आढळतात.

या पुस्तकातील सगळेच लेख उत्तम जमले आहेत या बद्दल शंका च नाही. लेखक हे दुर्ग प्रेमी,  खर तर सह्याद्री प्रेमी असल्यामुळे सह्याद्री तील वनांचा, औषधी वनस्पतींचा किंवा मग एकंदरच तिथल्या वनश्रीचा वेध घेणारा एखादा सघन लेख आला असता तर बहार आली असती. एकूणात या पुस्तकातून आसमंतातलं जे जे सुंदर आणि सच्च आहे ते ते लेखक आपल्या पुढे मांडतो, त्याला स्वतः कष्टाने मिळवलेल्या  देखण्या छायाचित्रांची जोड देतो आणि एक नवा आसमंत आपल्या पुढे उभा करतो.

लेखिका: मैत्रेयी केळकर

मुलुंड पुर्व.

संपर्क: 7718089242

Previous Article

२७ डिसेंबर 

Next Article

विविध विषयातील पदव्युत्तर शिक्षण तुमच्या कॉप्म्युटर-स्मार्ट फोनवर

You may also like