महाराष्ट्राला जगणे शिकवणारे गायक अरुण दाते

Author: Share:

 जन्म:  ४ मे १९३४

 पुण्यतिथी: ६ मे २०१८

अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३४ रोजी झाला. त्यांचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले आणि पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे झाले.

अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीतदिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह केला मात्र आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि मराठी भावगीत विश्वातील माईलस्टोन बनले.

अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.

त्यांच्या शुक्रतारा  या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बम लोकप्रिय आहेत.

मंगेश पाडगावकर- यशवंत देव आणि अरुण दाते या त्रिकुटाने मराठी भावविश्वाला वैभव दिले आहे. पाडगावकरांनी लिहिलेली आणि यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेली अखेरचे येतील माझ्या, भातुकलीच्या खेळामधली, भेट तुझी माझी स्मरते,  या जन्मावर या जगण्यावर ही गाणी ह्या वैभवाची सिंहासने आहेत. शुक्र तारा मंद वारा हे पाडगावकरांनी लिहिलेले गाणे श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आहे, हे वर आले आहेच. असेन मी नसेन मी ही शांत शेळके यांची कविता यशवंत देवांनी संगीतबद्ध केली आहे.

असाच यावा पहाटवारा हे शांताराम नांदगावकरांनी लिहिलेले गाणे अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केले आहे. सूर मागू तुला मी कसा हे सुरेश भटांचे आणि स्वरगंगेच्या काठावरती हे शंकर वैद्यांचे गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केली आहेत.

अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांना ‘राम कदम कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे. त्याशिवाय त्यांना २०१०चा पहिला गजाननराव वाटवे पुरस्कारही प्राप्त झाला होता.

आज ६ मे २०१८, पहाटे त्यांचे सकाळी ६ वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा ८४ वा जन्मदिन झाला होता.

मराठी भावविश्वाच्या ह्या शुक्रताऱ्याला स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

संदर्भ: मराठी विकिपीडिया

Previous Article

ते डीएड चं जीवन:वादविवाद स्पर्धा

Next Article

४ मे 

You may also like