Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

एनाबेल क्रिएशन: स्मार्ट महाराष्ट्र रिव्ह्यू

Author: Share:

जुनीच कथाशैली; पण आपण दचकतोच…

दिग्दर्शक: डेविड सॅंडबर्ग
कलाकारः स्टेफनी सिगमॅन, तलिथा बेटमॅन, एंथनी लापगलिया, मिरांडा ओट्टो

बाहुल्या तयार करणारा साम्युअल आणि इस्थर या दांपत्याची लहान मुलगी एका अपघातात दगावते. १२ वर्षांनंतर ते काही अनाथ मुलींना आपल्या घरात राहायला आसरा देतात. सहा अनाथ मुली आणि एक नन त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहायला येतात. त्यापैकी जेनिसा नावाची मुलगी एका पायाने अधू आहे. या घरात जेनिसाला विचित्र शक्तीचा भास होतो. तिला घरात एक बाहुली दिसते. ती बाहुली अर्थात भुताटकी असते आणि सुरु होतो थरार…

एनाबेलचे दिग्दर्शक डेविड सॅंडबर्ग यांनी याआधी लाईट्स आऊट नावाचा चित्रपट केला होता. लाईट्स आऊटची कथा मुळातच चित्तवेधक होती. त्यातील जे भूत असतं ते भूत थोडं वेगळं होतं. मानसिक भयपट असं त्या चित्रपटाचं वर्गीकरण करता येईल. परंतु एनाबेलची कथा त्या मानाने अगदी साधी सरळ आहे. एक भयाण घर आणि त्या घरात राहायला आलेले नवे पाहुणे अशी कथा आपण पाश्चात्य भयपटात बर्‍याचदा पाहिली आहे. अनेक चित्रपटांचे समीकरण झपाटलेले घर आणि घरात नव्यानेच राहायला आलेले लोक असे का असते? हे मला तरी अजून कळलेले नाही. या व्यक्तीरिक्त सुद्धा अनेक वेगळ्या पद्धतीच्या कथा लिहिल्या जाऊ शकतात. पण लेखक आणि दिग्दर्शकांनी ही बाब जरा जास्तच मनावर घेतलेली दिसते, असो. जरी कथेत फारसे नाविन्य नसले आणि पटकथेतही फारसा दम नसला तरी पाश्चात्य दिग्दर्शक लोकांना घाबरवण्यात यशस्वी होतात किंवा किमान दचकवतात तरी.

मी एक गोष्ट नक्कीच नमूद करीन की डेविड सॅंडबर्ग हे भयपटाचे मास्टर आहेत. सर्वसाधारण पटकथेलाही ते ज्या प्रकारे न्याय देतात, हे पाहणे अत्यंत रंजक असते. हा चित्रपट लाईट्स आऊटच्या तुलनेने जरी चांगला नसला तरी या चित्रपटाला डेविड सॅंडबर्गचा स्पर्श असल्यामुळे थरार कायम राहिला आहे. पण सॅंडबर्गनी पटकथेकडे विशेष लक्ष दिले असते तर हा थरार शिगेला पोहोचला असता. बाहुल्यांमध्ये असलेली भुताटकी ही संकल्पना खुपच जुनी आहे. त्यामुळे रहस्य कायम ठेवणं कठीण जातं. इथे कथेमध्ये या बाहुलीसाठी जे रहस्य दाखवण्यात आलं आहे ते मनाला सहसा पटत नाही किंवा त्यात फारसा दम नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर सुद्धा बाहुली दिसते. त्यामुळे ज्या क्षणी चित्रपट पाहताना आपल्याला बाहुली दिसते तेव्हा आपल्याला कळतं की भूताकटी सुरु झाली आहे. त्यातलं थ्रील निघून जातं. पण तरीही सॅंडबर्ग यांनी चित्रपट खुलवण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली आहे, हे आपल्याला जाणवते.

या चित्रपटात जेनिसाची भूमिका निभावणारी १५ वर्षीय तलिथा बेटमॅन ही संबंध चित्रपटात प्रेक्षकांना आकर्षून घेते. जरी या चित्रपटात तिच्यापेक्षा वयाने प्रौढ असलेल्या सुंदरआणि मोहक मुली असल्या तरी तलिथाने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक सीन जीवंत केला आहे. तिची थंड पण भेदक नजर. तिला वाटणारी भीती, तिचं अधूपण आणि नंतर विशेष कोणतेही मेकअप न करता तिने दिलेले भयाण लूक्स, या सर्वात प्रेक्ष गुंतत जातो. त्याचसोबत स्टेफनी सिगमॅन या सुंदर अभिनेत्रीने ननची भूमिका केली आहे. तिच्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना तिने मोहित केले आहे. एंथनी लापगलिया या अभिनेत्यानेही कोणताही आव न आणता त्याचे पात्र चांगले रंगवले आहे. पार्श्वसंगीताची उत्तम संगत लाभली आहे. चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू उत्तम आहेत. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपटाची कथा आणि पटकथा सामान्य आहे. डेविड सॅंडबर्गकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा आहेत. ही अपेक्षा ते पुढच्या चित्रपटात भरुन काढतील असे मानायला हरकत नाही.

आपण या चित्रपटाला २ स्टार्स देऊया.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Previous Article

मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा?

Next Article

२१ ऑगस्ट

You may also like