अनाथांची कैवारु कांचन वीर

Author: Share:

कांचन वीर…म्हणुन प्रसिद्धीच्या झोतात असलेली कांचन प्रदिप कांबळे ह्या सध्या विश्वशांतीदुत म्हणुन वावरतात आहे.त्यांचा जन्म यवतमाळ येथील नेरसोपरांत येथे झाला. बालपणीचा काळ जरी चांगला गेला तरी मुलींबाबतचा वेगळाच संभ्रम असल्याने तिचं लग्न अगदी अल्पवयात झालं.म्हणजे बारावीत असतांनाच ती विवाहाच्या बोहल्यावर चढली.

समाजातील सर्वांच्या शिक्षणाची होत असलेली आबाळ प्रत्यक्ष डोळ्यात साठवुन ती जगत असतांनाच तिचा विवाह झाला. पण समाजभान तिला काही स्वस्थ बसु देत नव्हतं. सुरुवातीपासुनच परिस्थितीचे चटके एवढे अनुभवलेत की खरंच या चटक्यामुळेच तिच्या रोमारोमात सामाजिक कार्याची ज्योत प्रज्वलित झाली.

कांचन ही वसतीगृहात राहणारी मुलगी……वसतीगृहात कशी वागणुक मिळते.याची पुर्ण जाण होती तिला.जेवायला मिळणारं खाद्यान्नच नाही तर तेथील वागणुक सावत्र आई परसही छळाचीच वाटायची. त्यातच या वसतीगृहातील मुलींना पैसे तुटपुंजे मिळत असल्याने पैशाची शिक्षणात नेहमी अडचण भाषायची. त्यातच काही काही मुली या पैशाअभावी आपलं शिक्षण मधातच सोडुन जायच्या तर कोणाचे मायबाप आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मुलांना शिकवीत. पण मुलींना शिकवीत नसत. हा भेदाभेद होता स्री-पुरुषात… आजही आहे. पण म्हणुनच की काय कांचनने निर्णय घेतला या मुलींसाठी जगायचं.यांचं पालकत्व स्विकारायचं. यांच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही यासाठी झटायचं. म्हणुनच लग्नानंतर ती स्वस्थ बसु शकली नाही.

विवाह अगदी थाटात पार पडला असला तरी आधीचं असलेलं समाजकार्याचं बाळकडु तिला स्वस्थ बसु देत नसल्यामुळे ती मनात ठरविलेलं ध्येय पुर्ण करण्यासाठी समाजसेवेत उतरली.

काही दिवस जाताच तिने वसतीगृह काढलं. त्यासाठी परतफेडीच्या नावावर कर्ज काढलं. समाजातुन काही दानदाते शोधले.पण हे काढलेले परतफेडीचे पैसे सावकारांना परत करु शकली नाही. म्हणुन सावकार घरी येवुन पैसे मागु लागले. कारण दानदात्याचे पैसे कमी पडु लागले.
सुरुवातीला या वसतीगृहात चारच मुली होत्या. पण हळुहळु त्यांची संख्या दोनशे चाळीसवर गेली. या वसतीगृहासाठी सरकारचं अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला. पण ते अनुदान मिळु शकलं नाही. सगळं स्वतःच्या भरवश्यावर……


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


त्यातच यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती खुप विपरीत होती. इथे पाण्याचा अंश कमी होता. सतत कोरडा दुष्काळ पडत असल्यानं शेतक-यांच्या आत्महत्येचं पीक यवतमाळमध्ये जास्त. उस्मानाबाद दोन नंबरवर. शेतकरी आवताव न पाहता आत्महत्या करीत होते.

कांचनचा समाजकार्याचा पिंड यावेळीही जागा झाला. तिला वाटलं की आपण कदाचित या मृत शेतक-याच्या पत्नींची भेट घ्यावी.त्यांचं सांत्वन करावं. हवं तर पाहिजे ती मदत करावी. ती मृत झालेल्या शेतकरी कुटूंबाची भेट घेवु लागली. त्यांच्या भावना समजुन घेवु लागली. काय करता येईल याचा विचार करु लागली. पण उपाय काही सुचेना.त्यातच ती एका घरी गेली,ज्या घरात आई आजारी होती. तिला लहानसं बाळ होतं. एक गाय खुंटाला बांधलेली होती. बाळ साधारणतः आठ नऊ वर्षाचं.त्याला दुसरा भाऊ होता.तो सहा महिण्याचा होता. मोठ्या मुलाचे खेळण्याचे दिवस ते….

आई आजारी असल्याने तिला उठता येत नव्हतं. त्यामुळे आईच्या म्हणण्यानुसार त्यानच चुल पेटवली होती. कसेतरी तिखट मीठ टाकुन त्यानं भात चढवला होता चुलीवर. तसा तो चुल फुंकत होता. तर आई त्या घरातल्या धुळीनं की आजारानं खोकलत होती.
कांचन जेव्हा भेट द्यायला त्या घरी पोहोचल्या, तेव्हा बाहेर अंधार पडला होता. घरातही अंधारच होता. विज भरु न शकल्यानं लाईनमेननं इलेक्ट्रीक कापुन नेली होती. राकेल तेल मिळत नसल्याने खाद्य तेलावर एक दिवा घरात सुरु होता. फक्त एकच दिवा. अंथरुण टाकलं होतं बाहेर.

घरी एकच पलंग दिसला.पलंग कसला?ती मोडकी तोडकी खाट होती. त्यावर कसबशी एक सातरी टाकली होती. तर खाली अजुन एक गोधडी टाकली होती. त्यावर तान्हुलं सहा महिण्याचं बाळ झोपलं होतं. त्याच्या तोंडात त्याच्याच हाताचा अंगठा होता.दुधासारखा तो अंगठा चोखत होता. कदाचित त्या लहान बाळालाही परिस्थीतीची जाणीव होती की काय? तो लहानगा बाळ रडतही नव्हता.
कांचन घरी पोहोचली. तिनं ते दृश्य पाहिलं .ती म्हणाली,
“बाळा स्वयंपाक तु का करतोस?”
“आई बिमार हाये.”
“अन् हा असा का झोपलाय खाली?”
“आई बिमार हाये नं.तिची बिमारी लागु नये म्हुन.”
“केव्हापासुन बिमार हाये?”
“सहा महिने झाले.बाप मेला तवापासुन.”
“मग तुमचं भागते कसं?”
तो मुलगा तोंडाकडच पाहात राहिला.बहुतेक त्याला समजलं नसेल ते.
कांचन परत म्हणाली.
“बेटा,तुम्ही पोट कसं भरता?”
“गाईच्या दुधापासुन.”
“म्हणजे?” कांचननं उत्सुकतेनं प्रश्न केला.
“गाईचं दुध विकतो मी.”
तेवढासा मुलगा.त्याच्याकडे पाहुन कोणालाच विश्वास बसणार नाही का तो गाईचं दुध काढत असेल.पण परिस्थीतीनं सगळं शिकवलं त्याला.स्वतः परिस्थीतीशी संघर्ष करीत होता तो लहानसा मुलगा.शिकण्याचं वय होतं त्याचं तरीही……पण बाप मेल्यानंतर घरी करायला कोणी नाही म्हणुन शाळा सोडली होती त्यानं.कांचन पुन्हा म्हणाली.
“बेटा गाय चारायला तुच नेतो की चारा आणतो.?”
“चाराले नेतो गाय वावरात.”
“मग हा लहान भाऊ?”
” याले बी नेतो.”
“का बरं आईजवळ का ठेवत नाही.”
“नाय,कोणी म्हणत्यात आईची बिमारी लागन.”
त्याच्या बोलण्यावरुन वाटत होतं. त्याच्या आईला मोठा आजार झाला असावा. कांचननं ते विचारायचं टाळलं. पण एक गोष्ट जाणवली की आई अशी मृत्युशय्येवर असतांना आईला खाट अन् बाळ खाली झोपतो. याचं कारण काय म्हणुन विचारलं. तर मुलगा म्हणाला,
“आई बिमार हाये.तिले कोणती तकलीफ व्हाले नोको.”
किती मोठे विचार. वय लहान असुन हा मुलगा किती मोठ्या विचारानं बोलतोय.याचं आश्चर्य वाटत होतं. आपली व आपल्या लहान भावाची काळजी न बाळगता आईची काळजी घेणारा मुलगा……आईला सुख लाभावं म्हणुन खाली झोपणारा मुलगा…..खरंच कांचनताईंना महान वाटलाय. तशी ती म्हणाली.
“बेटा,शाळेत जातोय का?”
“नाय,त्याचं शिक्षण सुटलं माह्या तब्येतीनं.”आई म्हणाली.
तशी कांचनताई बाळाला म्हणाली.
“बेटा शिकायची इच्छा आहे का?”

त्याने उत्तर दिले नाही. तसं तिला रडु कोसळलं. ते अश्रु तिने डोळ्यातुन दाखविले नाही. पण गरज ओळखुन कांचनताईंनी या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी स्नेहआधार संस्था उभारली. सावकाराच्या सततच्या तगाद्याने परेशान होवुन कांचनने स्वतःची पाच एकर शेती विकुन टाकली नव्हे तर स्वतःच्या लेकरासारखी ती या मुलांचा सांभाळ करत आहे.

या प्रवासात तिला अनेकजण पैशाची मदत करतात.पण तीही मदत तोकडी पडते. आजही ती त्या पोरांसाठी खपते ती त्यांची माय बनुन…मात्र या प्रवासात ती किती यशस्वी होते हे काळच ठरवेल.अशा या महान समाजसेविकेला तिचे कार्य हे एक समाजसेवेचे कार्य समजुन सढळ हाताने मदत करावी. त्या मुलांना मदत केल्यास तुमच्या सत्कार्याला देवही शक्य ती मदत करेल. तुमची मदत हे कोणाचे तरी जीवन फुलविण्याच्या कामी येईल नव्हे तर देशाचे आधारस्तंभ बनविता येतील. तसेच तुम्ही केलेली मदत ही कदाचित शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्याच्या कामी येईल. तिच्या निःस्वार्थ कार्याबद्दल या कांचनताईला सलाम. तसेच तिला निःस्वार्थ मदत करणा-यांनाही सलाम. परमेशा तिच्या कार्यात यश देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

लेखक: अंकुश शिंगाडे लेखक नागपुर

९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

भारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या

Next Article

गांधी आणि सावरकर ह्यांच्यातील अंतर !

You may also like