अक्षय तृतीया

Author: Share:

वसंत ऋतूच्या वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया अक्षय तृतीया या नावाने ओळखली जाते. परशुराम जयंती सुद्धा ह्याच दिवशी साजरी केली जाते. वर्षातील शुभ अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, सोने, घर अशा मालमत्ता घेण्यासाठी उत्तम काळ आहे. या दिवशी दानधर्म, व्रतवैकल्ये, जपजाप्य केल्यास कर्मफळ निरंतर टिकते अशी श्रद्धा आहे. या दिवशी काहीतरी दान करण्याची प्रथा मात्र आपापल्या कुवतीप्रमाणे पाळली जाते. मात्र ह्या दिवसाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जलदानाला ह्या दिवशी महत्व आहे. धनिक वर्ग ह्या दिवसापासून ठिकठिकाणी पाणपोया उघडून तहानलेल्यांना पाणी वाटतात.

जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. भगवान वृषभदेव यांनी पूर्णता प्राप्त करण्यासाठी वर्षभर तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते.व्रत समाप्ती झाल्यावर हस्तिनापूर येथे ते आले त्यावेळी तेथील राजाने त्यांना ऊसाचा रस पाजला. हा दिवस अक्षय्य तृतीयेचा होता अशी जैन धर्मात धारणा आहे. हा दिवस व्रत म्हणून पाळला जातो

ह्या जलदानाला आयुर्वेदीय महत्वही आहे. ही प्रकतृतिस्वास्थ्याची भूमिका आहे. याचे कारण, वसंत ऋतुपुर्वी शिशिर ऋतूत शरीरात कफ साठलेला असतो. चैत्र महिन्यातील उष्णतेमुळे कफ पातळ होतो. अशावेळी थंड पाणी प्यायले की कफाचा त्रास अधिक, चैत्र संपून वैशाख सुरु खाल्यावर शरीरातील कफाचे प्रमाण कमी झालेले असते आणि वैशाखातील तप्त वातावरणामुळे शरीरातही उष्णता वाढू लागलेली असते. त्यामुळे अक्षय तृतीयेवून थंड पाणी पुण्यास सुरुवात करायला हरकत नसते.

पाण्याला आयुर्वेदात जीवन असे म्हटले आहे. पाणी श्रमाचा नाश करणारे श्रम परिहारक आहे. मूर्च्छा, तहान आणि तंद्रा, मलावरोध दूर करणारे आणि बळ देणारे आहे, सर्व सहा रसांचे जनकत्व लाभलेले आणि देणारे आहे. पाण्यामध्ये सहा रस अव्यक्त स्वरूपात व्यक्त झाले आहेत असे एका श्लोकात नमुद आहे.

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करण्यात येते.  अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे.

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हेकिंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

थोडक्यात आज केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना क्षय नसतो असे समजले जाते. तुमच्याही आयुष्यातील सर्व सुख समाधान अक्षय टिकून राहो ही शुभेच्छा!

Previous Article

आई

Next Article

गणेशविद्या

You may also like