जाणून घेऊया एड्स विषयी!

Author: Share:

एड्स हा आजार जागतिक समस्या आहे. भारतात एड्स आजाराच्या रुग्णांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन ही एक मोठी समस्या आहे. कॉलरा, विषमज्वर, मलेरिया, क्षयरोग, कर्करोग इ. आजार हे उपचार व शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बरे होतात अशा रुग्णांकडे आपण सहजतेने पाहतो. मात्र तितक्याच सहजतेने एड्स रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला तरच समस्या सुटू शकेल. त्यासाठी आपण आपल्या धोरणात नवी दिशा, नवी गती, सामाजिक व मानसिक दृष्टीकोन ठेवून मानवतावादी चेहरा दिला पाहिजे. मानवी आरोग्य व जगण्याचा अधिकार मिळावा आणि एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी १ डिसेंबर जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो.

ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लू बॅन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन जिनेव्हा (स्वित्झरलँड) येथील जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ.जॉनथन मान (एड्स ग्लोबलचे संचालक) यांच्या सहमतीनंतर १ डिसेंबर, १९८८ पासून जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे `माझे आरोग्य माझा अधिकार!

१९८१ मध्ये एड्स या आजाराची ओळख झाली. लॉस एंजिलिसचे डॉक्टर मायकल गॉटलीब यांच्या निदर्शनास आले की, पाच पेशंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा न्यूमोनिया दिसला. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती अचानक कमजोर होऊ लागली. हे पाचही रुग्ण समलैगिंक होते. सुरुवातीस डॉक्टरांना वाटले हा आर फक्त समलैगिंक लोकांमध्ये आहे. म्हणून एड्सला ग्रीड म्हणजे गे रिलेटिड इम्यून डेफिशियन्सी असे नाव देण्यात आले. पण दुसऱ्या रुग्णांमध्ये सुध्दा या आजाराचे विषाणू मिळू लागले तेव्हा चुकीची धारणा आहे, असे वाटू लागले. 1982 मध्ये ग्रीडचे नाव बदलून एड्स म्हणजे एक्बायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिड्रोंम असे ठेवण्यात आले. प्रतिकार शक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोग लक्षणांच्या एकत्रिक समूह म्हणजे एड्स होय. एड्स वर कोणतेही प्रतिबंधात्मक लस अद्याप उपलब्ध नाही. प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.

एच.आय.व्ही विषाणू शोध : सन १९८३ मध्ये डॉ.ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) आणि डॉ.रॉबट गॅलो (अमेरीकन) शास्त्रज्ञाने एचआयव्ही विषाणूचा शोध लावला. १९८६ मध्ये पहिल्यांदाच या विषाणूला एचआयव्ही म्हणजे ह्युमनो डेफिशिएंसी वायरस हे नाव दिले. भारतात १९८६ साली चेन्नई (मद्रास) मध्ये एचआयव्हीचा रुग्ण आढळला.

एच.आय.व्ही /एड्स विषयी समुपदेशन : समुपदेशन ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीला काही समस्या असेल किंवा आजाराविषयी वैचारिक गोंधळ असतो. त्यासाठी त्याला दुसऱ्याच्या मार्गदर्शनाची गरज भासते. कारण समस्या ग्रस्त व्यक्तीला तिचे निराकरा करुन घेण्यासाठी मनोधर्य त्या व्यक्तीकडे नसते. समुपदेशनाच्या माध्यमातून समुपदेशन करुन एचआयव्ही एड्स कशामुळे होतो. कशामुळे होत नाही या विषयी माहिती सांगितले जाते. तर एखादी व्यक्तीची एचआयव्ही/एड्स चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर त्याचे मानसिक संतुलन न बिघडता पुढील पुढील जीवन जगण्यासाठी धीर देणे. या आजाराने विषाणूची वाढ वाढू नये म्हणून एआरटी उपचार पद्धती विषयी माहिती सांगणे व नियमित उपचार इ. माहिती सांगून या आजाराचे रुग्णांना व त्यांच्या परिवाराला मानसिक व सामाजिक सहानूभूती दाखविणे.

मनुष्य हा कुटूंबाचा प्रमुख कणा आहे. एच.आय.व्ही/एड्स या आजाराची लागण झाल्यावर कुटूंबात होणारा मानसिक व सामाजिक ताण यामुळे कुटूंबाची मानसिक स्थिती खालवली जाते. यासाठी समुपदेशन महत्त्वाचे ठरेल.

एच.आय.व्ही/एड्स प्रसाराचे प्रमुख मार्ग :-

१) एच.आय.व्ही/एड्स बाधित व्यक्तीशी असुरक्षीत लैगिंक संबंध.

२)  एच.आय.व्ही बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास (रक्त संक्रमण)

३) एच.आय.व्ही बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निरजंतुक न करता परत वापरल्यास

४) एच.आय.व्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या प्रसुतीच्या वेळी मुलाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये याकरिता तिला एआरटीची उपचार पद्धती सुरु करुन तिच्या बाळाला जन्मानंतर 72 तासांच्या आत व 6 आठवडे नेव्हीरॅपीन औषध दिल्यास एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येतो.

एच.आय.व्ही/एड्स आजाराची लक्षणे :-

१) अकारण वजनात १0 टक्के पेक्षा घट होणे.

२) सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे (१ महिन्यापेक्षा जास्त कालावधी)

३) सतत जुलाब होणे व आजार कोणत्याही औषधाने बरा न होणे.

४) तोंडात बुरशी व अन्न नलिकेत चट्टे उठणे.

५) तीन महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी लसिका ग्रंथींची सुज गंभीर स्वरुपाची इ.

एच.आय.व्ही.बाधित व्यक्तीशी: डास चावल्याने, हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसल्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने इ. एड्सचा प्रसार होत नाही.

रुग्णांलयात ऐच्छिक एच आय व्ही मोफत चाचणी: एच आय व्ही आजारांविषयी समुपदेशन करुन संमतीपत्र भरुन मोफत चाचणी केली जाते. व रिपोर्टची गुप्तता पाळळी जाते. वेस्टन ब्लॉट टेस्ट व पी सी आर टेस्ट जगात सर्वात सुधारित व प्रगत चाचणी आहे.

गुप्तरोग व प्रतिबंध उपचार : गुप्तरोग व एच.आय.व्ही पासून बचाव करण्यासाठी कंडोमचा वापर योग्य व नियमित करावा गुप्तरोगाचा पूर्णपणे उपचार घेणे आवश्यक आहे. अपूर्ण उपचाराने एच.आय.व्ही ची बाधा होण्याची शक्यता असते.

ए.आर.टी (अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी) उपचार पद्धत : अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी म्हणजे एच.आय.व्ही विषाणू प्रमाण कमी करणे एखाद्या व्यक्तीस एच.आय.व्ही बाधा झाल्यास जवळच्या मान्यता प्राप्त ए.आर.टी केंद्रात जाऊन डॉक्टांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्यात येते. या सर्व सुविधा (शासनस्तरावर) मोफत आहे.

शासन स्तरावर एच आय व्ही/एड्स बाधितांना न्याय : एच.आय.व्ही बाधितांसाठी ना हक्काचे संरक्षण मिळणेसाठी शासनाने एच.आय.व्ही /एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) विरोधक २०१४ मध्ये दुरुस्ती प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या दुरुस्तीनुसार एच.आय.व्ही. ग्रस्तांना शिक्षण रोजगार, वैद्यकिय उपचार, निवास यामध्ये भेद भावाची वागणूक देणाऱ्या व्यक्ती

शासन स्तरावर जनजागृती अभियान : केंद्रशासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत महाराष्ट्रात शासकीय/निमशासकीय, म.रा.ए.नि.सो धर्मदाय इ.मार्फत एच.आय.व्ही एड्स आजाराची जनजागृती (प्रभात फेरी विविध कार्यक्रम राबवून, लोक कला इ. माध्यमातून) केली जाते. विविध वृत्तत्र, इलेक्ट्रानिक मीडिया इ. मार्फत जनजागृती केली जाते.

१९९१ साली पहिल्या वेळेस लाल फित (रेड रिबन) आतंरराष्ट्रीय जनजागृतीचे एड्सचे प्रतिक मानले गेले. एच.आय.व्ही या आजाराने मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी, ज्याची या आजाराने हानी झाली आहे. त्यांना आधार दाखवण्यासाठी आणि त्यांना झळ पोचलेली आहे. त्यांच्याशी दृढ सामाजिक बांधिलकी म्हणून लाल फित लावली जाते.

-हेमकांत सोनार,

प्रयोगशाळा तंत्रज्ञ रायगड जिल्हा रुग्णालय, अलिबाग

साभार: महान्यूज

Previous Article

९ डिसेंबर

Next Article

महाराष्ट्रात १६ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

You may also like