आदित्य

Author: Share:

आज सकाळी नेहेमीप्रमाणे स्टेशनवर गेलो. जोरदार पाऊस पडत होता. लोकल नेहेमीपेक्षा जरा जास्त उशिराने चालत होत्या. मी प्लॅटफॉर्म नं.2 वर गाडीची वाट बघत उभा होतो. इतक्यात प्लॅटफॉर्म नं.1 वरून काही रेल्वे कर्मचारी स्ट्रेचर घेऊन जाताना दिसले. सोबत एक पोलिस पण होता. प्लॅटफॉर्मवरची माणसे बोलत होती, ‘लटकत जात होता आणि खाली पडून मेला.’ सगळेजण त्याला त्याच्या चुकीबद्दल शिव्या देत होते. मला मात्र त्या मुलापेक्षा त्याच्या आई-वडिलांबद्दल वाईट वाटत होते. जगातले कोणतेही आई-वडील वाट्टेल ते दु:ख सहन करू शकतात पण एक दु:ख सहन नाही करू शकत, “बाप के कांधे पे बेटे का जनजा.”


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


इतक्यात माझी लोकल आली. उशीर झाल्यामुळे गर्दी पण जास्त होती. मी कसाबसा शेवटी चढलो, पण मी पुर्णपणे दरवाज्याच्या आत होतो. लोकल चालू झाली. एवढ्यात एक मुलगा धावत-धावत आला आणि माझ्यामागे दरवाज्याला लटकत उभा राहिला. मला प्रथम त्या मुलाचा राग आला. ‘एक लोकल चुकली तर कोणे एवढे आभाळ कोसळणार आहे?’ असे मला वाटले. तो मुलगा ज्या खांबाला लटकून उभा होता तो खांब पावसाचे पाण्याने ओला झाला होता. मला वाटले त्याचा हात सटकू शकतो.

मी त्याला माझ्या खांद्याला पकडायला संगितले. मग तो मुलगा एका हाताने माझ्या खांद्याला विळखा घालून व एक हात दरवाज्याच्या दांड्याला पकडून दरवाज्याच्या कडेवर कसाबसा उभा राहिला.

जोगेश्वरीला थोडी गर्दी कमी झाली आणि तो आत येऊन उभा राहिला. त्याने मदत केल्याबद्दल माझे आभार मानले. त्याचे नाव आदित्य होते. त्याचे वडील अंधेरीच्या एका हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते. त्यांना हृदविकारचा झटका आला होता. त्याची आई निवृत्त शिक्षिका होती. तिच्या पेन्शनवर आदित्याचे घर चालले होते. आदित्याला हल्लीच एक नोकरी मिळाली होती. पण तो प्रोबेशनरी काळ होता. त्याला कंपंनीच्या कामासाठी एक महिना सुरतला जावे लागले होते. प्रोबेशनरी काळ असल्यामुळे त्याला सुट्टी घेऊन वडिलांना भेटण्यासाठी यायला जमत नव्हते. त्याचे वडील सतत त्याची आठवण काढत होते.

आज सकाळीच तो परत आला होता आणि त्याला वडिलांना भेटून कामावर जायचे होते. कारण जर आज त्याने सुट्टी घेतली असती तर त्याची नोकरी गेली असती आणि वडिलांना भेटला नाही तर त्यांच्या जीवाचे काहीतरी बारे वाईट झाले असते आणि तो धक्का त्याची आई पचवू शकणार नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. म्हणून त्याला ही गाडी पकडणे खूप गरजेचे होते. माझ्या मनातला त्याच्यावरचा राग कमी झाला आणि त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली.

माझे लक्ष सहज त्याच्या अवताराकडे गेले. त्याचा शर्ट काखेत उसवला होता, बूट कमीतकमी पाच वर्षापूर्वीचे असतील, बॅगेला दहा ठिकाणी ठिगळं चिटकवलेली होती. त्यात त्याला वडिलांची औषधे घ्यायची होती. आम्ही लोकल मधून उतरलो. आम्हाला एकाच बस पकडायची होती. बसमध्ये चढल्यावर त्याने विचारले, ‘मी जरा तुझा मोबाइल वापरू शकतो का? माझा Balance संपला आहे.’

मी त्याला माझा फोन दिला. त्याने त्याच्या डॉक्टरांना फोन लावला आणि वडिलांच्या तब्बेतीची चौकशी करू लागला. मी फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्याच्या नकळत रविवारी मित्रांसोबत Transformers Movie बघायला जाण्यासाठी साठवलेले 500 रु ची नोट त्याच्या बॅगेत टाकली. याचे कारण म्हणजे एकतर त्याने माझ्याकडून पैसे घेतले नसते आणि दुसरे म्हणजे बॅगेत पैसे सापडल्यावर ते आपलेच आहेत चुकून बॅगेत राहिले असे त्याला वाटेल. त्याचा स्टॉप आला. त्याने माझा फोन परत दिला आणि जाता-जाता माला म्हणाला, “आज तू तीन लोकांचे प्राण वाचवलेस.” मलाही एका गरजवंताला मदत केल्याचे समाधान मिळाले आणि ऑफिसला जाऊन स्वत:ला कामात बुडवून घेतले.

संध्याकाळी घरी परतल्यावर माझ्या मोबाइल वर एक मेसेज आला. माझ्या नंबर वर कोणीतरी 500 रु चा रिचार्ज मारला होता. मला काहीच कळेना. मग काही वेळाने मला एक मेसेज आला,
“प्रिय सुधाकर,
मी तुझा नवा मित्र आदित्य.

तुझा नंबर मला डॉक्टरांच्या मोबाइल मधून मिळाला. माझ्या वडिलांची प्रकृती आता सुधारत आहे. माझी नोकरी पण आज पक्की झाली, आणि मी नेहेमी घरातून निघताना माझी बॅग तपासतो बरं का. अरे मला खरचं पैशाची गरज नव्हती. माझ्या आईने माझ्या नकळत एक R.D. अकाऊंट उघडला होता त्याची मुदत आज संपली आहे. जपून ठेव हे पैसे. एखाद्या दुसर्‍या आदित्यासाठी कामी येतील……..”

खरच आपल्याला दररोज प्रत्येक ठिकाणी बरेच आदित्य भेटत असतात. कोणी खरे असतात तर कोणी खोटे. ते आपल्याला फसवतील या भीतीने आपण त्यांना मदत करायचे टाळतो. पण निदान त्यांच्या विचत्र वागण्यामागे खरोखर काहीतरी कारण असेल याचा विचार करून किमान त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न तरी करू शकतो ना? कारण माणसाच्या मनातले ओळखू शकणारा pk हा फक्त अंतराळातच आहे.

मला राहून-राहून एकच प्रश्न सतावतो की, सकाळी अपघातात मेलेला सुद्धा कोणीतरी ‘आदित्य’ तर नसेल ना?……..

लेखक: सुधाकर अशोक तळेकर
सौजन्य: साहित्य उपेक्षितांचे, श्री. निलेश बामणे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

सेन्सेक्समध्ये ३० अंशाच्या वाढीसह ३३६२६ ची पातळी गाठली 

Next Article

अंदमान : हिंदुस्थानचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र

You may also like