आध्यात्मिक क्षेत्रातील भोंदूगिरी…

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


शिवापासून वेगळा झालेला जीव पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा काळ म्हणजे जीवन; हे जीवन जगत असताना जीवाला शिवात विलीन करण्यासाठी अथवा तो व्हावा म्हणून काय करावे, कसे वागावे, कसे बोलावे, कसे राहावे हे ज्या माध्यमातून सांगितले जाते ते मध्यम म्हणजे आध्यात्म… आध्यात्म हे काही कोणा फक्त विशिष्ट एका धर्माच्या मालकीची असणारी गोष्ट नाही. आध्यात्म जात – धर्म मानत नाही त्याला फक्त जीव आणि शिव इतकेच माहीत असते. ते शिवतत्व वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या रुपात मानले गेलेले असते इतकेच !
आध्यात्मात शिव आणि जीव यांच्या मधे उभा असतो तो गुरु जो जीवाला मार्गदर्शन करत असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली जीव शिवाकडे वाटचाल करत असतो. पूर्वीच्या काळी एखादा शेतकरी गुरं चरवायला घेऊन गेला आणि तिथे एखादा धनगर भेटला आणि त्यांची मैत्री झाली की तो गुराखी कधी – कधी त्या धनगरालाही आपला गुरू मानून त्याच्याकडून उपदेश घेत असे आणि त्याच्या उपदेशाप्रमाणे आयुष्यभर वागत असे.

साधारणतः गुरू शिष्य परंपरेत गुरूने शिष्याच्या कानात काहीतरी नव्हे तर ज्या मंत्रात ओम चा अंतर्भाव आहे असा मंत्र सांगायचा आणि शिष्याने पुढे तो गुरुमंत्र म्हणून आयुष्यभर त्या मंत्राचा जाप करायचा. त्याचे चांगले परिणाम निश्चित मिळतातच. ते परिणाम म्हणजे गुरुची कृपा मानायची. आध्यात्म म्हणजे साधनेच्या मार्गाने जन्म – मरणाच्या बंधनातून सुटण्यासाठी सांगितलेला मुक्तीचा मार्ग पण आज त्या मार्गावर अनेक दलाल उभे आहेत स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणारे ! शेकडो वर्षांपूर्वी काही खरे आध्यात्मिक गुरू होऊन गेले पण आज त्याची परंपरा चालविणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके सोडले तर बहुतेक सारे भोंदू गुरू आहेत. एक दोन आध्यात्मिक ग्रंथांची घोकमपट्टी करायची आणि त्याची पारायणे करायची त्यात प्रामुख्याने गीतेचा अंतर्भाव असतो कारण ती आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ ! गीता हिंदूंचा धर्मग्रंथ असतानाही कित्येक हिंदूंनी मरेपर्यत वाचणे तर सोडाच ऐकलेलीही नसते. गीता तरुणपणी वाचायची नसते असेही म्हणतात कारण गीता ज्याला समजते तो संन्याशी होतो मग ! कशाला आपण आध्यात्माचे ढोंग करतो ?

आजचे आध्यात्मिक गुरू कोणतेही घ्या त्यांच्या आश्रमाबाहेर अथवा मटा बाहेर त्यांचे गंडे- दोरे, फोटो, ताईत, लॉकेट, कॅलेंडर, आरतीची पुस्तके, सीडीज बरचं काही विकायला असतेच त्यात भर म्हणून देणगीसाठी एक काउंटर असतेच. आपल्या श्रद्धेपोटी शिष्य अथवा भक्त ते विकत घेतात पण गुरू भक्तांना अथवा शिष्याना मोक्षाचा मार्ग सांगताच कोठे ? एकही गुरू आपल्या शिष्यांना तुम्ही पूर्ण शाकाहारी व्हा ! असे सांगत नाही कारण तसे केले तर शिष्य अथवा भक्त निम्मे होतील. आजचे भक्त अध्यात्मिक गुरूंकडे काय समस्या घेऊन जातात ? माझी अध्यात्मिक प्रगती का होत नाही ? हा प्रश्न विचारत नाहीत तर काय विचारतात; माझ्या मुला – मुलींची लग्न का होत नाहीत , झाली असतील तर त्यांना पोरं का होत नाहीत , पोरं असतील तर ती सारखी आजारी का असतात, आजारी असतील तर आमच्या कोणी वाईटावर तर उठले नाही नाही ना, आणि उठले असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याचा काही मार्ग आहे का ?

अध्यात्मिक गुरू यावर मार्ग काय सांगणार तर जप वाढवा अथवा घरी भजन ठेवा ! गुरू स्वत: ब्रह्मचारी आणि या संसारी लोकांचे सांसारिक प्रश्न सोडवत बसतो मग त्यांना अध्यात्मिक ज्ञान कधी देणार ? आपला मुलगा अथवा मुलगी लग्न करत नाही म्हणून साकडं कोणाला घालतात तर ब्रह्मचारी गुरूला, अध्यात्माचा धंदा दुप्पट व्हावा म्हणून मधल्या काळात काही संसारी सुख उपभोगणाऱ्या आध्यात्मिक गुरूंचा उदय झाला म्हणजे डबल धंदा त्यांनी तर आपल्या शिष्यांचा सामूहिक विवाह लावण्याचा नवीन उद्योग सुरु केला ! अचानक तरुण अविवाहित भक्त वाढविण्याचा नवीन मार्ग शोधून काढला कारण हल्ली तरुणांचे खिसे फारच गरम असतात… शिष्याला खऱ्या गुरूला शोधावे लागते पण आजकाल गुरुच शिष्याला शोधत येतात. भक्तांना गोमूत्र पाजून करोडोंची माया जमा करणारे, इतर अनैतिक मार्गाने भक्तांना लुबाडणारे कित्येक आध्यात्मिक गुरू आज तुरुंगात हवा खात असतानाही लोकांचे डोळे उगडत नाहीत कोणताही गुरू बाबा कोणालाही मोक्षाचा मार्ग सांगू शकत नाही कारण तो जर त्याला ठाऊक असता तर तो तो सांगायला येथे नसताच ! हे भक्तांना कधी लक्षातच येत नाही.

पूर्वी आध्यात्माच्या क्षेत्रात फक्त पुरुष गुरूचे प्राबल्य होते पण आता त्यात महिलांचीही नेत्रदीपक भर पडली आहे. आध्यात्मात मोक्ष मिळविण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यातील संन्याशी होऊन संसार त्यागने, दोन कटोर साधना करणे आणि तीन संसारात राहून सर्वकर्मफल इश्वाला अर्पण करणे यातील तिसरा मार्ग गीतेत सांगितला आहे आज बहुसंख्य भक्त शिष्य हे अध्यात्मिक गुरू आणि बाबांच्या नादाला का लागतात याची काही ठळक कारणे समोर येतात त्यातील एक महत्वाचे कारण मनशांती मिळावी, दुसर कारण टाईमपास व्हावा, तिसरं कारण आपला जनसंपर्क वाढवावा आणि त्याचा फायदा आपला उद्योग वाढविण्यासाठी करावा आणि सर्वात महत्वाचे आपण आध्यात्मिक असल्याचा टेंबा समाजात मिरविण्यासाठी ! यातील बहुसंख्य करून करून भागले आणि देवपूजेला लागले या वृत्तीचे असतात. समाजातील वाढत्या अनैतिक संबंधांना वाढीस लावण्यात या आध्यात्मिक गुरूंचे असणारे योगदान नाकारता येणार नाही.

टीव्हीवर प्रवचन देणाऱ्या महिला आध्यात्मिक गुरू पहिल्या की त्यांनी सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यप्रसादनांचा केलेला पुरेपूर वापर सहज नजरेत येतो त्यांना आध्यात्मिक ज्ञान म्हणजे त्यांची समरणशक्ती चांगली असते आणि आवाज गोड आणि मोहिनी घालणारा असतो त्यांची स्वतःची आध्यात्मिक प्रगती किती झालेली असते हा खरं तर संशोधनाचाच विषय आहे. लोकांना वाटत आम्ही सकाळ संध्याकाळ जप केला आठवड्यातून दोनदा मटाला भेट दिली म्हणजे दक्षिणा अथवा देणगी दिली की मोक्ष मिळतो. आध्यात्माच्या नावावर या भोंदू गुरूंनी हळू – हळू देवाला बाजूला सारून त्याच्या जागेवर आता स्वतःला बसविले आहे बहुसंख्य शिष्यांच्या देव्हाऱ्यात आता बाबा बुवा बसलेत. भक्ताच्या भावना दुखवू नये म्हणून त्यांना कोणी काही बोलत नाही.

मोक्षाचा एकमेव मार्ग म्हणजे गुरू असा प्रचार आणि प्रसार हे गुरू सातत्याने करत असतात. ” गुरूविना मोक्ष नाही ” सर्वात फसवे वाक्य आध्यात्मिक क्षेत्रातील हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात. दत्तगुरूंनी कोठे गुरू केला त्यांनी तर निसर्गातील घटकांनाच आपला गुरू मानला तसा तो सर्वसामान्य माणसेही मानू शकतात मग सध्याच्या घोर कलियुगात भोंदू गुरू हवेत कशाला सध्याच्या मिडीयावर या गुरूंचे आध्यात्मिक कारनामे रोज झळकत असतात. तसे पाहता आई हा प्रत्येक जीवाचा प्रथम गुरू असतो आज त्या गुरुची काय अवस्था आहे समाजात ? आज जे वृद्धाश्रम थाटले जातात ते कोणासाठी ??

आध्यात्माच्या नावावर तरुणांच्या मनात भ्रामक विचार भरले जातात. कधी कधी त्यांना धर्मांध केले जाते आणि हे धर्मांध तरुण मोक्षाचा नाही तर गुन्हेगारीच्या मार्गावर पाऊल टाकतात. ही गुरू ज्यांचा तंत्र – मंत्र, जादू- टोना, संमोहन आणि ज्योतिष्य या विषयांचा अभ्यास असतो त्याच्या जोरावर ते काही भाकिते करू शकतात त्यातील काही बऱ्याचदा सत्यात उतरतात आणि मग करोडपती हुशार आणि बुद्धिमान लोक त्यांच्यासमोर लोटांगण घालायला सुरुवात करतात आणि मग रातोरात हे गुरू बाबा आध्यात्मिक क्षेत्रातील मोठी हस्ती होतात आणि त्या फलस्वरूप अब्जावतीची माया गोळा करतात. मोह नष्ट करण्याची शिकवण जगाला देतात आणि स्वतः मात्र स्वतःला मोहात गुंतवून घेतात. “साईबाबा ” खरे अध्यात्मिक गुरू ,गुरू करताना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा . म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील भोंदूगिरी काही प्रमाणात कमी करता येईल…

लेखक – निलेश दत्ताराम बामणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

सुरु झालिया पेरन..!

Next Article

अंध व्यक्तींचे व्यवसाय आणि अडचणी

You may also like