रमेश भाटकर

Author: Share:

जन्म ३ ऑगस्ट १९४९

स्मृती: ४ फेब्रुवारी २०१९

आपल्या दमदार आवाज आणि विश्वासपूर्ण वावराने अभिनय व्यापणारे रमेश भाटकर मराठी आणि हिंदी नाट्य, टीव्ही आणि सिनेमा मधील ज्येष्ठ अभिनेते. मात्र त्यांचा अधिक ओढा मराठी रंगभूमीकडे होता.

रमेश भाटकर हे प्रसिद्ध भजनसम्राट-संगीतकार स्नेहल (वासुदेव) भाटकर यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. ‘अश्रूंची झाली फुले’ आणि त्यातील ‘लाल्याची’ भूमिका  विशेष गाजली. ‘उघडले स्वर्गाचे द्वार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘षडयंत्र’, ‘केव्हातरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ ही त्यांची इतर काही गाजलेली नाटके. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.काही महिन्यांपूर्वीच ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता.

रमेश भाटकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने तीन दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘कमांडर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’ या मालिकांनी रमेश भाटकर घराघरात पोहोचले. माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.

अभिनयासोबत ते चॅंपियन स्विमर आणि खोखो खेळाडूही होते.

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . वयाची सत्तरी गाठली तरी भाटकर यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. वार्धक्याच्या खुणाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसल्या नाहीत. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते.

नुकत्याच आलेल्या “एन एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” ह्या चित्रपटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका त्यांनी केली होती. कर्करोगाशी ते मागील वर्षभर झगडत होते. मात्र शेवटचे काही दिवस उरले आहेत हे माहित असल्याने अधिकाधिक काम करण्याकडे या सच्च्या कलाकाराचा ओढा राहिला. हि निष्ठा त्यांच्या विषयी आदर अधिक वाढवते.

अभिनयाच्या या कमांडरला स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!!

Previous Article

पुलवामा हल्ल्यानंतर…  

Next Article

५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, वाचा सर्वसामान्यांसाठी अजून काय बेनिफिट आहेत?

You may also like