राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी

Author: Share:

नांदगाव ( प्रतिनिधी) मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे यंदा सलग दुसर्‍या वर्षी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मनमाड शहरातील प्रसिध्द कवी साहित्यिक व पक्षीप्रेमी , निसर्गप्रेमी अमोलजी खरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे , सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष व प्रसिध्द कवी प्रदिप गुजराथी , माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, आदी मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम महाराष्ट्रातील प्रसिध्द लेखिका व साहित्यक्षेत्रातील दिग्गज असणार्‍या स्व.शिरीष पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या) यांचे नुकतेच निधन झाले म्हणून तसेच नुकत्याच जम्मु काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढतांना वीरमरण आलेल्या स्व.मिलिंद खैरनार या लष्करी जवानास आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

तद्नंतर भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले. तर जागतिक वाचक प्रेरणा दिन साजरा करीत असतांना वाचनालयात नियमित येणार्‍या सर्व स्तरातील म्हणजे जेष्ठ नागरिक, महिला , तरुण आणि बालवाचक यांचा एक प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करुन वाचनालयाने वाचन संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न या वाचक प्रेरणा दिनी केला असल्याचे आपल्या भाषणात अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले. वाचनालयातर्फे वाचनालयाचे माजी संचालक व जेष्ठ वाचक गोविंद कर्वे , एस.बी.चौरेसीया काका, व्ही.जी.कुलकर्णी सर, अशोक नारंग , सौ.ज्योती शरद डमरे, अशोक कदम, सुध्दांशु हेमंत सोनवणे, आणि पूर्वा प्रशांत कुलकर्णी या नियमित येणार्‍या वाचकांचा पुस्तकरुपी भेट देवून सन्मान व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार झाल्यानंतर हे सर्व वाचक विशेषतः जेष्ठ वाचक यांचे 50 वर्षापेक्षा जास्त वाचनालयाशी नाते आहे हे भारावून गेले.

वाचनालयाने आम्हा वाचकांचा सत्कार करुन नव्या पीढीला वाचनाची प्रेरणा देणारा उपक्रम राबविला असल्याचे आपल्या सत्काराला उत्तर देण्याच्या भाषणात वाचक अशोक कदम यांनी सांगितले. वाचनालयाचे माजी अध्यक्ष व प्रसिध्द कवी प्रदिप गुजराथी यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आपल्या भाषणातून मांडला तर मरेमा विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व वाचक हर्षद गद्रे यांनी देखील वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार व्यक्त केले. वाचनालय ही वाचन संस्कृतीला तर बळ देतातच परंतु जीवनातील निराशाजनक स्थितीमध्ये माणसाने वाचन केले तर सकारात्मक बळ मिळून त्याचा उत्कर्ष होवू शकतो आणि तो व्यसनापासून देखील परावृत्त होवू शकतो म्हणून वाचनाचे व्यसन लावून घ्यावे असे मार्मीक आवाहन आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोल खरे यांनी केले. या कार्यक्रमापासून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेले व यांच्यावर लिखाण असलेली सर्व पुस्तके वाचकांच्या वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती तर मरेमा विद्यालयातील इ.10 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थींनीनी यावेळी स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांचे 2 तास वाचन केले. या कार्यक्रमास  वरील सर्व मान्यवरांसह प्रकाश गाडगीळ सर, प्रमोद मुळे, मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक , मरेमाचे जेष्ठ शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख चेतन सुतार, निळकंठ त्रिभूवन, अक्षय सानप, कैलास भाबड, संजय गांधी, मनोज जंगम, नितीन आहेरराव, प्रशांत कुलकर्णी, सौ.कुलकर्णी, जेष्ठ शिक्षक व प्रसिध्द कवी हेमंत वाले , शुभम खैरे, राहुल लांबोळे, कु.मृणाल घुसळे, कु.प्रणाली शिंदे, कु.अंजली मोरे, प्रथमेश गिरामकर, श्रेयस कोंडुरकर आदी मान्यवरांसह मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, राजेश रौंदाळ यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

@ प्रा.सुरेश नारायणे

 

Previous Article

नांदगाव-संकल्प प्रदुषण मुक्त दिवाळीचा

Next Article

नांदगाव- मविप्रचे सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते व गुलाब भामरे यांची महाविद्यालयास भेट

You may also like