Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

Review: आरण्यक: एक मंत्रानुभव

Author: Share:

मराठी रंगभूमीवर आजपर्यंत अनेक प्रयोग झाले. काही नवीन पायंडे पडणारी नाटके आली. काही हसतमुखाने काही थोड्याश्या वादळानंतर ही नाटके मराठी रंगभूमीवर रुजली. विविध विषय, मांडणीवैशिष्ट्य, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मराठी रंगभूमीने जोपासले कौतुक केले.  अशा प्रयोगांनी मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे होते आहे होणार आहे. प्रयोगशील लिखाण हे रंगभूमीचा आत्मा आहे. कलाकारांइतकेच प्रेम मराठी रसिकांनी लेखकांवरही केले. हे लिहिण्याचे कारण हेच की प्रयोगशीलता आणि सुंदर लेखन या दोहोंचा मिलाफ असलेले एक अभिजात सौंदर्याने नटलेले नाटक सध्या रंगभूमीवर चव्वेचाळीस वर्षांनंतर पुन्हा आले आहे. रत्नाकर मतकरी लिखित आणि दिग्दर्शित आरण्यक.

नाटकाचा विषय तोच आहे, ज्याने भारतातील अन विश्वातीलही अनेक लेखकांना कवींना भुरळ पडली आहे- महाभारत. महाभारत म्हणजे जीवनाचे सार. व्यासांनी स्पर्श केला नाही असा विषय विश्वात नाही असे महाभारताचे वर्णन होते. अर्थात, त्यातील एकेका घटनेवर, एकेका व्यक्तिरेखेवर कादंबरी होऊ शकेल इतके ते गहन आहेत. हे विषय ह्या व्यक्तिरेखा म्हणूनच संवेदनशील लेखकांना नेहमीच आकृष्ट करीत असतात. मात्र, रत्नाकर मतकरींच्या प्रतिभेला महाभारतातील त्या काळाने भुरळ घातली जिथे महाभारतातील नाट्य संपते अर्थात महाभारताचा रणसंग्राम संपतो. आणि इथेच ह्या प्रतिभासंपन्न लेखकाची लेखनशैली सोन्याचे शब्द लेवून येते. जे ऐकावेसे वाटतात, पाहावेसे वाटतात अनुभवावेसे वाटतात. आरण्यक एक लेखकाचे नाटक आहे. एका लेखकाचे संपूर्ण पद्य नाटक!

हे शब्दभांडार सांभाळण्यासाठी नटही त्याच ताकदीचे हवेत. झी मराठी आणि अद्वैत थिएटर्स ने आरण्यकच्या ह्या प्रयोगात किंवा महाभारताच्या भाषेत पर्वात, हा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे. दिलीप प्रभावळकरांचा गंभीर तत्वज्ञ विदुर, रवी पटवर्धनांचा आयुष्यभर भोगविलासी राहिलेला आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी निर्विकारकडे जाणारे मन आणि विकार सोडवता न येणारे शरीर ह्या कात्रीत सापडलेला धृतराष्ट्र, पतिव्रतेच्या धर्म, पत्नीचे कर्म, आईचे दुःख यांच्या सोबतीने जगणारी प्रतिभा मतकरींची गांधारी, राज्यधर्माचे तेज ल्यालेली आणि संतुलित विचार करणारी कुंती ह्या चार मुख्य पात्रांनी रत्नाकर मतकरींच्या शब्दात आत्मा भरून जिवंत केले आहे. आरण्यक म्हणून एक नाटक न राहता एक अनुभव घेण्याचा विषय होऊन राहतो.

नाटकाचा प्लॉट अगदी साधा आहे. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांकडे हस्तिनापूरच्या राज्याची धुरा आली आहे. धृतराष्ट्र आणि गांधारी यांना राज्यपदे सोडावी लागली आहेतच, आपल्या शतपुत्रांच्या मरणाचे दुःखही त्यांना घेऊन जगायचे आहे. तत्वज्ञानी असलेला विदुर धीरगंभीर आहे, मात्र एक सल तो आपल्या उराशी घेऊन जगतो आहे, आणि राजमाता पद मिळूनहा आता संतुलित विचारांची कुंती निर्विकार होऊन शेवटच्या आयुष्याकडे पाहते आहे.राज्यपद गमावलेला धृतराष्ट्र युयुत्सुच्या आत्महत्येनंतर पित्रुत्वही गमावतो आणि आपल्या डोक्यात चाललेल्या कोलाहलाला शांत कसे करावे असे विदुराला विचारतो. विदुर त्याला अरण्यात जाण्याचा वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा सल्ला देतो. आयुष्यभर त्याला साथ केलेली गांधारी, विदुर आणि राज्यभोगाची कुठलीही मनीषा न बाळगणारी कुंती सोबत त्यांचा सेवक प्रतिहारी सर्व अरण्यात जाण्यासाठी निघतात. अरण्याच्या सुरुवातीच्या कालखंडात त्यांना सांसारिक क्लेशातून मुक्त होऊन निसर्गाच्या आणि परमेश्वराच्या अधिक जवळ आल्याचे समाधान लाभते. ह्याच वेळेस गांधारी कुंती आणि विदुराच्या सांगण्यानुसार व्रत म्हणून आयुष्यभर डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडते. त्याच सुमारास, एक पारधी विदुराला आपण अनवधानाने श्रीकृष्णाला मारल्याचे सांगतो. हे ऐकून विदुर भ्रमिष्ट होतो आणि आपले प्राण त्यागतो. हे वृत्त ऐकून कुंती गांधारी आणि धृतराष्ट्रही अरण्याला आपल्याला अग्निरूपाने नष्ट करण्याची विनंती करतात आणि लागलेल्या वणव्यात स्वतःला झोकून देतात. हे कळल्यावर प्रतीहारीही स्वतःला संपवण्याची इच्छा बाळगतो.

वास्तविक ज्यात विशेष काही नाट्य घडत नाही अशा प्लॉटवर अडीच तास चालणारे नाट्य घडवण्याची किमया रत्नाकर मतकरींच्या शब्दांनी साधली आहे. केवळ नाट्य घडत नाही ते खिळवून ठेवते. केवळ खिळवून ठेवत नाही, तर भगवद्गीतेतील तत्वज्ञान राजस भाषेत मांडते. भगवद्गीतेच्या तत्वज्ञानातील कर्मयोग अर्जुनाने युद्धात दाखवला. मात्र गीतेतील इतर योग अनुभवण्यासाठी ‘आरण्यक’ पाहावे. म्हणूनच ‘आरण्यक’ प्रेक्षकांसाठी सर्वार्थाने एक कार्यशाळा ठरते.

युयुत्सु त्याला छळणाऱ्या दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वतःला संपवतो. मात्र त्याला सद्गती मिळत नाहीच. पिशाच्च होऊन तो विदुराला एकदा भेटतो, आणि सगळेच प्रश्न मरणाने सुटत नाहीत अशी कबुली देतो. अरण्यात जाण्याचा विषय आल्यावर भोगविलासात अडकलेले धृतराष्ट्राचा शरीर त्याला न जाण्याच्या लोभात पाडते. धृतराष्ट्र त्या कफल्लक अवस्थेतही त्याने  तारुण्यात घेतलेला शरीरसुखाचा कैफ विदुराला ऐकवतो. सर्वस्व गमावल्यावरही लोभ माणसाची साथ सोडत नाही. कुंती ही एकमेव चैतन्यावस्थेत आहे, जिला नुकत्याच मिळालेल्या राजमातापदाची अभिलाषा नाही. आपल्या मुलांना हस्तिनापूरच्या राज्य युद्धाने मिळवण्यास उद्युक्त करणे माझा धर्म होता असे ती मानते. ते मिळाल्यावर त्यांनी राज्यपदाचे आपले कर्तव्य पार पाडायचे आहे असे ती म्हणते, आणि निरपेक्ष भावनेने अरण्यात यायला निघते. ज्या धृतराष्ट्र गांधारीच्या कौरवांनी आपल्या मुलांना त्रास दिला, आपल्या सुनेची विटंबना ज्याच्या दरबारात झाली, आता त्या सर्वांचा सूड ज्यांनी केले त्यांच्याकडून घेतल्यावर, तिला कुठलाही राग उरलेला नाही. उलट कौरवांचे श्राद्ध घालण्याची इच्छा गांधारीने व्यक्त केल्यावर, तुम्हास वाटेल तेवढे  खुशाल दान करावे, पांडवांचे भांडार त्यासाठी उघडे आहे, असे वचन ती गांधारीस देते. शत्रू मेल्यावर शत्रुत्व संपण्याचा हा तो धडा आहे. तिच्याही मनात एक शल्य आहेच, कर्णाला आपण लज्जेखातर ओळखण्यास नकार दिल्याने त्याचा युद्धात नाहक बळी गेला ह्याचे. सुतपुत्राऐवजी त्याला सूर्यपुत्र अशी ओळख आपण देऊ शकलो असतो तर आज त्याने राज्यपद मिरवले असते हे ती पुन्हा पुन्हा बोलून दाखवते. गांधारीने पती दुःखात सहभागी होण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा असीम त्याग केला. तिच्याही मनात आपल्याला पतीने एकदाही रोखले नाही हे शल्य पहिल्यांदाच ऐकावयास मिळते, आणि धृतराष्ट्रही त्याबद्दल क्षमा मागतो. पत्नीधर्मासोबत हा पतिधर्मही असल्याचे लेखक यातून सुचवतो. गांधारीस आपण पट्टी बांधलेले पहिले आहे. त्यामुळे ह्या वळणावर कुंती जेंव्हा तिची पट्टी उघडते तो प्रसंग टाळी घेऊन जातो. आयुष्यभर तत्त्वज्ञानाच्या पुतळ्याची प्रतिमा सन्मानाने मिरवलेला विदुर आपले तत्वज्ञान धृतराष्ट्राने केवळ ऐकले पण केले कौरवांच्या मनासारखेच, आपण केवळ ग्रंथ म्हणून उरलो हा सल व्यक्त करतोच, पण माझ्याही तत्वांना प्रत्यक्षात अंगिकारण्याची वेळ आली तेंव्हा आपण गप्प बसलो, भर सभेत द्रौपदीची विटंबना, कुरुक्षेत्रावरचा नरसंहार थांबवण्यावेळेस मी कृती केली नाही हे बोलून लेखकाने, निव्वळ शब्दजंजाळ निर्माण करणारे मात्र कृतीसमयी गप्प बसणारे विचारवंत समाजाला अधिक धोकादायक असतात हेच अधोरेखित केले आहे. युधिष्टिर आणि प्रतिहारी सुद्धा धर्माधर्माच्या प्रश्नांना उत्तरे देताना भग्वद्गीतेचाच आधार शोधतात. अखेरच्या समयी सर्व अग्नीच्या आहारी गेलेले पाहून प्रतिहारी सुद्धा जीव देऊ इच्छितो, तेंव्हा श्रीकृष्ण त्याला त्याच्या धर्माची जाणीव करून देतो, पुन्हा हा डाव मांडण्याची आज्ञा देतो हा प्रसंग अंतानंतर पुन्हा सुरुवात होते ह्या सृष्टीच्या नियमाचे प्रतीक ठरते आणि अग्निप्रलयाच्या घटनेनंतर कानी येणारे नांदीचे सूर दुःखानंतरच्या आनंदाच्या क्षणांची अनुभूती देतात.

रत्नाकर मतकरींच्या प्रतिभाशाली नजरेला दिसलेला भगवद्गीतेचा अर्थ आणि त्यासाठी युद्धानंतरचा हा वापरलेला प्रसंग ह्यातून एक विलक्षण नाटक मतकरींनी घडवले आहे. जे मुळातच उत्तम लिहिले गेले आहे, त्याचे दिग्दर्शनही मतकरींनी तितक्याच संवेदनशीलतेने केले आहे.पार्श्वसंगीत खूप सुंदर समर्पक आणि नाटक अन मूळ महाभारताच्या विषयाचे गांभीर्य टिकवून ठेवणारे आहे. प्रकाशयोजनेसाठी वेगळी दाद मिळावी ह्या क्षमतेचे आहे, आणि नेपथ्य अतिशय नाविन्यपूर्ण आहे.

गद्य नाटकांची सवय असलेल्या आणि आरण्यक माहित नसलेल्या प्रेक्षकांना पहिल्या अर्ध्या तासात जुळवून घेण्यास थोडा वेळ जातो, मात्र आपला प्रेक्षक किती सुजाण आहे. दुसऱ्या अंकापासून तो नाटकाशी अधिक एकरूप होतो आणि तिथेच काही महत्वाच्या घटनांनी नाटक बांधून ठेवते. अंतिम अर्ध्या तासात नाटक वेगळ्याच उंचीला पोहोचते, ज्याची प्रेक्षकांना सवय नाही. मात्र येथे प्रेक्षक पूर्ण तयार असतो. काही प्रसंग टाळी घेऊन जातात, काही शब्द वाहवा घेऊन जातात पण बरेच प्रसंग असे घडतात ज्यात मनात होणारी आंदोलनेही नीट ओळखता येत नाहीत, हाच तो प्रेक्षक म्हणून समृद्ध करणारा अनुभव आरण्यक देऊन जाते. यासाठी आरण्यक पहिलेच पाहिजे.    

Previous Article

‘स्पायडर मॅन’ चे पिता स्टेन ली वयाच्या ९५व्या वर्षी कालवश 

Next Article

एका सज्ञान सुजाण मराठी समाजाच्या दिशेने..

You may also like