Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

Review: ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’: एक ‘लांडगा’ चित्रपट

Author: Share:
डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील वादळ होते हे वाक्य त्यांची कारकीर्द पाहिलेल्या पिढीकडून ऐकू येते. ती न पाहिलेल्या पिढीला ते वादळ अनुभवायचे असेल तर ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपट आहे. वादळाची कथा मांडण्यासाठी चित्रपट वादळी आहे, वेगवान आहे, अगदी डॉक्टरांच्या भाषेत ‘लांडगा’ चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा सरळ आहे. बऱ्याचशा बायोपिकमध्ये त्या व्यक्तीचा ठळक प्रवास रसिकांना ज्ञात असतो. गंमत असते ती त्याचे बारीक बारीक धागे कसे गुंतले जातात हे पाह्यची. प्रेक्षकांना ह्या बाबतीत चित्रपट गुंगवून ठेवतो. समोर घडणाऱ्या घटना ज्या पद्धतीने घडतात, किंबहुना ज्या घडतात त्या प्रसंगी शॉक्स देऊन जातात. काही घटनांची नांदी आधीपासून प्रेक्षकांना लागते त्यामुळे त्या कशा मांडल्यात हे पाहण्याची उत्सुकता उरते. काशिनाथ पर्व सुरु होणे त्याचे उच्च पद आणि त्यात येणारे हेलकावे आणि त्याचा अस्त ही प्रेक्षकांना माहित असलेली कथा आहे. त्यामुळेच लेखक दिग्दर्शकाचे कसब लागते, आणि अभिजित देशपांडे यांनी ती बाजू पेलली आहे.
चित्रपट का पाहावा याचे इतर कुठल्याही तांत्रिक आणि वैचारिक बाबतीत समर्थन करण्याआधी एका वाक्यात सांगता येईल, एका विशिष्ट काळातील मराठी रंगभूमीची बॅक स्टेज कथा ऐकण्यासाठी. मराठी रंगभूमीशी जोडला गेलेला प्रेक्षक चित्रपटात ते सर्वाधिक एन्जॉय करतो. अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेंव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू या कानेटकर लिखित नाटकांची काशिनाथ घाणेकरांपुरती का होईना पण निर्मितीकथा येते. चित्रपटाचा बराचसा प्रवास हा कलाकृतींच्या निर्मितीमागील कथानके असल्याने चित्रपट रंजक होतो. विशेषतः ज्यांनी डॉ घाणेकर रंगभूमीवर वावरताना पाहिले आहेत त्यांना हे रिलेट करणे अधिक रंजक होईल.
कथेचा आवाका खूप मोठा आहे. नाट्यसृष्टीत प्रवेश करण्यापासून ते अंतिम दिवसापर्यंतचा प्रवास लेखकाला मांडायचा असल्याने घटना झरझर घडत जातात. मध्ये बराच कालावधीही दाखवला आहे. डायलॉगमधून आणि नाटकांच्या सादरीकरणावेळेस लिहिलेल्या सनावरून झरणारा काळ प्रेक्षकांना समजत राहतो त्यामुळे प्रेक्षक इन राहतो.
समोर घडणारी कथा खरी असल्याने आणि त्यात शौर्यगाथेसारखे गिमिक नसल्याने, हे असे घडले असेल असा विचार प्रेक्षक करत नाही. त्यामुळे कुठेही ‘हे असे घडणे कसे शक्य आहे’ असे म्हणून तो कथेच्या बाहेर जात नाही. समोर घडणाऱ्या घटना ह्या डॉ घाणेकर यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आहेत. एका काळापर्यंत त्यातील काशिनाथ घाणेकरांच्या वागण्यात फरक असतो. नंतर त्यांचे वागणे दोन्हीकडील घटनांवर भारी पडू लागते. हा प्रवास दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
चित्रपटाविषयी अधिक आकर्षण म्हणजे डॉ लागू आणि काशिनाथ घाणेकर यांच्यातील द्वंद्. चित्रपटाच्या मध्यंतराला हे द्वंद्व सुरु करून मध्यांतराची हुरहूर दिग्दर्शक निर्माण करतो आणि ती पुढच्या हाल्फ मध्ये बऱ्यापैकी कॅरी सुद्धा झालेली आहे. एका विशिष्ट ठिकाणी ते संपवून दिग्दर्शकाने गोडवाही कायम ठेवला आहे. पणशीकर आणि घाणेकर यांच्यातील मैत्रीलाही दिग्दर्शक वेळ देतो. डॉ आणि कांचन घाणेकर यांच्यातील फुलणाऱ्या नात्याची गोष्ट कथानकाशी नाळ जोडून राहते. अर्थात, वैयक्तिक आयुष्यातील हेलकाव्यांपेक्षा व्यवसायिक आयुष्यातील चढ उतारांवर दिग्दर्शकाचा अधिक भर राहिला आहे, हे उत्तम.
आता चित्रपटाविषयीच्या महत्वाच्या आक्षेपाविषयी. नैतिकतेविषयी वाद चिकटलेल्या व्यक्तिरेखांवर चित्रपट पाहताना, त्यातील न पटणाऱ्या गोष्टींचे उदात्तीकरण तर दिग्दर्शक करत आहे अशी टीका होते. अझरुद्दीन आणि नुकत्याच आलेल्या संजू चित्रपटाविषयी ही टीका झाली होती. ह्याही चित्रपटात, डॉक्टरांच्या वागण्याविषयी नापसंती असलेल्या प्रेक्षकांकडून अशी काही टीका होण्याची शक्यता आहे. याविषयी आमचे मत येथे नमूद करावे लागेल.
डॉ घाणेकर यांच्याविषयी चांगलेच किंवा वाईटच अशी इमेज बनवून चित्रपट पाहता येत नाही. रंगभूमीशी नाळ जोडून तो तटस्थपणे पाहिला की प्रेक्षकाला उत्तम कथानक अनुभवल्याचा आनंद मिळू शकतो. डॉक्टरांकडून ज्या चुका घडल्या त्या चित्रपटात मांडल्या गेल्या आहेत, आणि त्याचे परीक्षण प्रेक्षक करू शकतो. त्यांच्याकडून चुका घडल्या याची कबुली पणशीकर पंतांच्या मुखीही दिलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कुठेच त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा त्या गोष्टींचे समर्थन करत आहे असे वाटत नाही. प्रेक्षकाने तटस्थ चित्रपट पाहावा इतकीच कलाकारांची आणि लेखकाची अपेक्षा आहे. त्यामुळे पंतांच्या तोंडी असलेले चित्रपटातील एक वाक्य  लक्षात राहते, हिंदी चित्रपटामुळे हेलकावे खाणाऱ्या रंगभूमीला  ज्यावेळी सुपरस्टारची गरज होती तेंव्हा काशिनाथ घाणेकर उभे राहिले, आज जेंव्हा त्यांना रंगभूमीची गरज आहे, तेंव्हा आपण हात वर करत आहोत.
या कारणाने चित्रपट पाहून झाल्यावर डॉ घाणेकरांविषयीच्या इमेजमध्ये फरक पडत नाही. डॉक्टरांच्या चुकांविषयी रागही येत नाही किंवा त्यामागील कारण सांगून त्यांचे समर्थन करण्याचा अविर्भावही चित्रपट करत नाही. डॉक्टरांनी मुलीला लिहिलेल्या पात्रातील वाक्याप्रमाणे, उद्या तुला माझ्याविषयी अनेक गोष्टी काळातील, काही खऱ्या काही खोट्या, मात्र आपला बाप एक उत्तम नट होता एवढे तिला समजले पाहिजे. हे सत्य प्रेक्षकांच्या मनावरही कायम राहते.
कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला आहे. काल्पनिक पात्रांपेक्षा खऱ्या पात्रांना कथेत जिवंत करणे अधिक कठीण. मात्र तगडी स्टारकास्ट असलेल्या टीमने हे शिवधनुष्य उत्तम आहे. डॉक्टरांची भूमिका असलेल्या सुबोध भावे पासून भालजींची भूमिका करणाऱ्या मोहन जोशींपर्यंत. अगदी पिंजऱ्यातील एका गाण्याच्या काही सेकंदाच्या एपिअरन्स मध्ये अमृता खानविलकरही वाहवा घेऊन जाते. प्रसाद ओक यांचे पंत पणशीकर आणि आनंद इंगळे यांचे प्रा वसंत कानेटकर उत्तम. सोनाली कुलकर्णी यांच्या सुलोचनादीदी उत्तम. सुमित राघवन यांचे उमेदीच्या काळातील डॉ श्रीराम लागू अफलातून झाले आहेत. सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या अभिनयाने घाणेकर-लागू यांच्यातील द्वंद्व अधिक उठावदार झाले आहे. विशेषतः त्या कालखंडात आलेल्या विविध नाटकातील प्रवेशाचे सादरीकरणही पाहायला मिळत असल्याने त्या काळाशी रिलेट होणे प्रेक्षकाला आवडतेच पण नकळत नाटकातील अभिनय आणि चित्रपटातील अभिनय यातील फरकसुद्धा प्रेक्षकाला पटकन कळू येतो. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाआधी केलेला रिसर्च अधिक ठळकपणे उठून दिसतो.
प्रेक्षकांचे अमाप प्रेम लाभलेल्या आणि रंगभूमीवर बरेच पहिल्यांदा घडवून आणणाऱ्या एका उत्तम अभिनेत्याची आणि त्याभोवती गुंफलेल्या कलाकार, लेखक आणि रंगभूमीच्या एका काळाची कहाणी पाहिल्याचे समाधान मिळते.  चित्रपटाचे यश मोजायचे असेल तर किती स्क्रीन्स आणि आठवडे चित्रपट चालतो आहे याच बरोबर इंग्रजी चित्रपटांबाबतीत होते त्याप्रमाणे, कांचन घाणेकर यांच्या ज्या “नाथ हा माझा” ह्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे त्या पुस्तकाची विक्री पुढी काही दिवसात वाढलेली दिसली पाहिजे.
मराठी प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा. रंगभूमीच्या त्या काळासाठी, डॉ काशिनाथ घाणेकर ह्या रंगभूमीला जीव वाहिलेल्या अभिनेत्यासाठी आणि २०१८ मध्ये आलेल्या एका उत्तम कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी. ए मस्ट वॉच फिल्म!
Previous Article

लालन सारंग

Next Article

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलंची जन्मशताब्दी: जन्मशताब्दी महोत्सव

You may also like