सत्तरी ओलांडलेला नवतरुण…

Author: Share:

नागपूर वरून महत्वाची बैठक संपवून गुरुजी व मी साधारण रात्री 11.30 च्या सुमारास पुण्यात पोचलो. पुण्यातीलजेष्ठ कार्यकर्ते पुण्यात न्यायला हजरच होते. गाडीत बसलो आणि गुरुजी म्हणाले सरळ स्वारगेट ला सोडा. खरं सांगायचं तर गुरुजींच्या सोबत इतक्या लांब मी प्रथमच गेलो होतो. दिवसभर भयानक दगदग झाल्याने शरीर थकलेलं व डोळे झाकत होते.

पण सोबत गुरुजी असल्याने तसे जाणवून देत नव्हतो. मनात म्हटलं पुण्यात आल्यावर निदान जेवायला तरी मिळेल मात्र गुरुजी सरळ स्वारगेट ला चल म्हणल्यावर मनातल्या मनात खूप दुःख झाले पण पर्याय नव्हता. पुण्यातील कार्यकर्ते गुमान गाडी चालवत स्वारगेट पर्यंत आले. 12.30 होत आले आणि गुरुजी या वेळेत सुद्धा कमालीचे उत्साही होते. 12.30 ते ला स्वारगेट बस स्थानकावर सांगली गाडी पहायला अक्षरशः धावत होते आणि मी त्यांच्या मागे. एखादी गाडी सुरू झाली की माझ्याकडे रागाने पाहत ..अरे धाव जरा, बघ कोणती एस.टी. आहे असे म्हणायचे आणि असल्या अवस्थेत मी धावत बस पहायचो.

गुरुजींना बस मधील विलक्षण ज्ञान होते. एशियाड बस ते मुद्दाम सोडून देत होते… म्हणायचे, बसची चाल हत्तीची आणि भाडे विमानाचे असते. मला नवल वाटायचे या गोष्टीचे. आयुष्यभर बस शिवाय त्यांनी प्रवास केला नव्हता आणि बस मधील कंडक्टर जवळची सिट ही गुरुजींच्या बसण्याची हमखास जागा. साधारण 20 मिनिट धावपळ करत अखेर सांगली बस मिळाली आणि आम्ही बसलो. अर्थात गुरुजींनी मला तिकीट काढून दिले नाहीच.. स्वतः काढले व ते कॅडक्टर जवळ बसले आणि मी असाच कुठेतरी मागे. मला कऱ्हाड जवळ महामार्गनजीक उतरायचे होते म्हणून मी उंब्रज गेल्यानंतर उठून कॅडक्टर जवळ उभा राहिलो.

गुरुजी यावेळी सुद्धा जागेच होते. क्षणात माझ्याकडे पाहत बोलले… तुला इथे उतरावे लागेल नाही का? मी होय म्हणालो…..एव्हाना कॅडक्टर साहेब बाजूच्या सीटवर झोपी गेले होते त्यामुळे मी गुरुजींच्या जवळ बसलो. 3 वाजून गेलेले होते. मी म्हणालो आता गुरुजी सकाळी कुठे बैठक आहे? गुरुजी म्हणाले आज मिरज शहर बैठक आहे. 4 पर्यंत पोचेन मी सांगलीत… बरोबर5 वाजता घाटावर व्यायामाला जाणार…!हे ऐकून मला धक्काच बसला. काल सकाळी सांगली सोडून आम्ही अवघी दगदग सहन करतोय…जेवण, पाणी वेळेवर नाही… नागपुरात अखंड 4 तास सभा चालली आणि सभा संपली तशी परतीची यात्रा करत आम्ही बस मधून सांगलीला येतोय. माझे शरीर, डोळे अक्षरशः इतके थकले होते की कधी एकदा झोपतोय असे झाले होते आणि किमान 10 तास झोपल्याशिवाय उठायचे नाही असेही मन म्हणत असताना गुरुजी म्हणतात बरोबर 5 वाजता व्यायामाला घाटावर जाणार…!

मी धाडस करून विचारले…. गुरुजी थोडीतरी विश्रांती घ्यायची नाही का? यावर गुरुजी उत्तरले… कसली विश्रांती..? एहे.. बिलकुल नाही. हा शब्दच नामंजूर आहे. तिकडे शिवछत्रपती संभाजी महाराज, आई तुळजाभवानी माझी वाट पाहत असताना मी विश्रांती घ्यायचे हे महापाप आहे. एक लक्षात ठेव, शिवाजी महाराजांचे काम करायचे म्हणजे दररोज व्यायाम झालाच पाहिजे. ज्या दिवशी व्यायाम न करता अन्न खाईल ते विष्ठेसमान समजायचे. जवानी आणि तुमची खरी ओळख व्हायची आहे…. पुरात पोहणे, हजार हजार जोर मारणे, कुस्ती खेळणे, घोड्यावर बसणे खऱ्या जवानीचे लक्षण आहे… आपल्या हिंदू समाजाला याचा विसर पडला आहे, ते जागे करायचे काम म्हणजे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे. दररोज व्यायाम करणारा खरा धारकरी आहे…. शरीराचा मध्यप्रदेश (पोट) नेहमी छातीच्या आतच असला पाहिजे तरच शिवाजी महाराज की जय म्हणायचा अधिकार आहे……

पहाटे 3 वाजता एकदम उत्साही आवाजात गुरुजींचे हे बोलणे ऐकून आपण जवान असल्याची लाज वाटू लागली. एक क्षण पोटाकडे नजर गेली आणि जरा आत ओढले…. जीवनाचा फार मोठा मंत्र मला मिळाला. ज्या दिवशी व्यायाम नाही त्या दिवशी खाल्लेलं अन्न विष्ठेसमान…. मध्यप्रदेश (पोट) आतच पाहिजे….. वयाची सत्तरी ओलांडलेले गुरुजी आजही मनाने किती तरुण होते याची जाणीव झाली. ना झोपेची आसक्ती ना अन्न, पाण्याची गरज… उरात केवळ शिवाजी महाराज संभाजी महाराज घेऊन जीवन जगत आमच्यासारख्या कित्येकाना त्यांनी स्वतःच्या कृतीतून फार मोठी शिकवण दिली ज्याच्या जीवावर आम्ही आजही यशस्वी जीवन जगतोय. कऱ्हाड आले. मी पाया पडून निघालो… माझ्याकडे पाहत गुरुजी म्हणाले…. मध्यप्रदेश छातीच्या आतच पाहिजे….. मी हसलो. महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गाड्या होत्या आणि माझे मन त्यापेक्षाही जास्त धावत होते विचारांच्या लाटेत…

@बहिर्जी


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

भूक

Next Article

‘बावन्न’कशी शिवसेना

You may also like