२९ ऑगस्ट: आसनगाव ‘दुरांतो’ अपघात: डॉ विनय देवलाळकरांच्या अनुभवातून

Author: Share:

काल सकाळी नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतोला अपघात झाला. कुठल्याही अपघाताच्या ठिकाणी पहिल्यांदा आवश्यक असतात दोन गोष्टी… अपघातात अडकलेल्यांना धीर आणि प्रथमोपचार! सकाळी साडेसहा वाजता अपघाताची माहिती मिळाल्यावर डॉ विनय देवलाळकर तेथे पोहोचले. आणि पुढे वाचूया त्यांच्याच शब्दात! डॉक्टरांना देव का म्हणतात त्याची प्रचिती असे काही वाचल्यावर येते. या धन्वंतरीस ‘स्मार्ट महाराष्ट्र‘चा सलाम!

२९ ऑगस्ट: आसनगाव ‘दुरांतो’ अपघात: डॉ विनय देवलाळकरांच्या अनुभवातून

सकाळी 6:30 वाजताच एक इसम आला,घाबरत घाबरतच म्हणाला “दुरांतो एक्सप्रेस ला अपघात झालाय…4 डबे घसरलेयत..  वासींद व आसनगाव च्या दरम्यान.. तुम्हाला स्टेशन मास्तरांनी बोलावलंय…” ऐकताच सूक्ष्म चमक उमटली छातीत, अपघात! तो पण रेल्वे चा.. काय वाढून ठेवलंय समोर? क्षणात ना ना विचार चमकून गेले.

त्याला म्हटलं हो पुढे आलोच,

थोडं स्थिर झालो. ताबडतोब 108 च्या ambulance वरील डॉ पोटाकुले यांना फोन केला. माझ्या ड्राइवर ला फोन केला. होती नव्हती ती औषधी किट घेऊन निघालो!

वासींद पासून 3 km अंतरावर रेल्वे गेट पाशी दोन्ही ambulance, आम्ही दोघे डॉक्टर व माझा स्टाफ निघालो ,साधारण 2 km रेल्वे लाईनीतुन चालत गेलो. त्यात रात्री पासून पावसाने थैमान घातले होते. आताही पडतच होता. तेथे पोहोचल्यावर बघितले तर खरच जोरातच झाला होता accident! डबे विचित्र घसरले होते, रूळ उखडले गेले होते, पोल तुटून पडले होते, दोन डब्याची स्थिती तर अशी होती कि अजून थोडा जोरात झाला असता तर डबे खाली उलटे झाले असते… प्रत्येक डब्यात जाऊन चौकशी केली. नशिबाने जास्त कोणीही जखमी नव्हते ! खरंतर, त्यांना धीर देण्याचीच गरज होती.. दोघा तिघांना बघितलं, तर एका स्त्री ने बोलावलं-“डॉ साब,ये आंटीजी को पहले देखीये”

68-70 वय असावं,एकट्या च प्रवास करीत असाव्यात,मी काय होतंय विचारलं तर -“छातीमे दर्द हो रहा है” म्हणाल्या. मी तपासलं, “काही नाही,घाबरू नका” त्या म्हणाल्या – ” हमे अब पाहुचाएंगे कैसे? मै तो चल नही पाती”. मी पटकन म्हणालो- “फिकर मत किजीए, डोली से ले जायएंगे”. त्याही स्थितीत सगळ्यांना हसू फुटले मला माझीच चूक कळाली. मग त्यांना समजावून सांगितले – ” हमारे यहा पेशंट को जीस condition मे लेके जाते है असे डोली कहते है जिसे आप स्ट्रेचर!” हसून ती माऊली म्हणाली “जैसे आप ठीक समजो”..  तिने आत्मीयतेने पाठीवर फिरवलेला हात आज असीम समाधान देऊन गेला!

खाली सर्व पोलीस अधिकारी होते. त्यांच्याबरोबर आजूबाजूला फिरत होतो.. सुरक्षित असलेल्या डब्यातील लोक उतरून पायी निघाले होते त्यांच्यासाठी बस,जीप ची सोय केली होती.

एक 23-24 वर्षाची तरुणी पुढे आली व तिने विस्कळीत पडलेल्या बोगींची अवस्था बघितली.  तिच्या डोळ्यातील भीतीने थिजलेले भाव बरंच काही सांगून गेले.

अपघाताचे वृत्त समजताच मा. आमदार बरोरा साहेब,व खासदार मा. पाटील साहेब,जातीने धावत आले, वासींद ची शिवसेनेचे कार्यकर्ते,  RSS चे कार्यकर्ते.. पहिल्यापासून मदतीला हजर होतेच. JSW स्टीलचे अधिकारी व त्यांच्या बसेस मदतीला होत्या. स्थानिक लोक सुद्धा हिरीरीने मदत करीत होते.  लोकांना हाताला धरून उतरवणे.. त्यांचे सामान नेणे इ.  कुठेही गोंधळ नाही की इतर ठिकाणी ऐकू-वाचू येणारी लुटणारी वृत्ती नाही-  त्या सगळ्या लोकांना मानाचा मुजरा!!

बाकी, आपल्या देशातील लोकांच्या विचित्र मनोवृत्तीचा पण वाईट अनुभव आलाच! पण अपघातच इतक्या आडवाटेवर झाला होता की काही गोष्टींना उपाय नव्हता.

रेल्वेचे पथक व अधिकारी पण शक्य तितक्या लवकर आले. त्यांनीपण त्यांचे काम त्वरित सुरू केले. अपघात इतका जोरकस होता पण नशिबाने एकाही व्यक्ती ला गंभीर दुखापत झाली नाही वा एकही casualty नव्हती!

अपघातग्रस्त लोक काय विचार करीत असतील माहीत नाही पण ईश्वरी अस्तित्वावर आज दृढ विश्वास बसला कि कोणालाही लागले नाही!

तेथे पोहोचणारा मीच पहिला डॉक्टर असल्या मुळे लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला मान बघून व अपघातग्रस्त व्यक्तींना केलेल्या खारीच्या वाटेप्रमाणे मदतीने आज मला स्वतः चाच अभिमान वाटला हे सांगणे नकोच!!

डॉ विनय देवलाळकर, वैद्यकीय अधिकारी

Previous Article

नांदगाव-मुळडोंगरी येथे मुलांनी रोखून धरली बस

Next Article

२९ ऑगस्ट: मुंबई आणि पाऊस: माझा अनुभव: प्रवीण दाभोळकर

You may also like