Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

संगीताचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर : ( १८ ऑगस्ट १८७२—२१ ऑगस्ट १९३१ )

Author: Share:

महाराष्ट्रातील एक योर संगीतप्रसारक, गायनाचार्य व गायक. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ; पण पूर्वीचे पलुसचे रहिवासी असल्याने ते पलुस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले. 

त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील दिगंवरपंत हे चांगले कीर्तनकार होते व कुरुंद वाडच्या छोट्या पातीचे राजे दाजीसाहेब यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे राजघराण्यातच विष्णुबुवांचे शिक्षण सुरू झाले. 

विष्णूला लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग असल्यामूळे मिरज येथे असलेल्या संगीताचार्य पंडीत बालकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे पाठवून संगीतविद्या शिकविण्याचे ठरविण्यात आले). यांच्याकडे विष्णूने नऊ वर्षे मन लवून संगीताचा अभ्यास केला. विष्णुबुवांचा आवाज मेहनतीने अत्यंत गोड, सुरीला व बुलंद झाला होता.  पं. बाळकृष्णबूवांकडून त्यांनी अत्यंत शुद्ध स्वरूपात ग्वाल्हेर गायकी प्राप्त केली.

मिरज सोडल्यानंतर ते औंधसातारापुणेमुंबई करीत बडोदे येथे गेले. महाराणी जमनाबाईसाहेब यांना विष्णुबुवांचे गाणे खूपच आवडले आणि त्यांनी त्यांना तीन-चार महिने बडोद्यातच ठेवून घेतले. तसेच स्वतःची शिफारसपत्रे देऊन काठेवाड, सौराष्ट्र व राजस्थान येथील राजेलोकांकडे पाठवले. सर्व ठिकाणी त्यांच्या मैफली होऊन त्यांना चांगला पैसा मिळू लागला; पण पैसा मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते. संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा व कलावंतांना समाजात मानाचे स्थान मिळून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण जनतेला मुक्तहस्ते व कमी खर्चात मिळावे म्हणून ठिकठिकाणी संगीत विद्यालये स्थापन करणे, गरीब व सत्प्रवृत कुटुंबातील मुले घेऊन त्यांचे पालनपोषण करून, त्यांना संगीतकलेचे शिक्षण देणे व त्यांतून उत्तम कलाकार आणि संगीतशिक्षक तयार करणे, हे त्यांचे ध्येय होते. 

गिरनार पर्वतावरील एका साधूच्या उपदेशानुसार त्यांनी पंजाब हे कार्यक्षेत्र निवडले. लाहोर येथे ५ मे १९०१ रोजी त्यांनी गांधर्व महाविद्यालय ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या विद्यालयाद्वारे त्यांनी समाजात संगीताभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पद्धतशीर अभ्यासक्रम आखून संगीत विषयाच्या निरनिराळ्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या आणि त्यायोगे संगीत विषयक पदव्या विदार्थ्यांना बहाल केल्या. 

विद्यालयातर्फे संगीत परिषदाही भरविल्या. विष्णुबुवांनी या विद्यालयामार्फत निवडक विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शिरावर घेऊन त्यांना गायक बनविण्याचे कार्य केले. त्यांनी संगीतकलेला शिस्तबद्ध वळण लावण्याचा प्रयत्न केला व स्त्रीवर्गतही संगीताचा प्रसार केला. मुंबईच्या शाखेत स्त्रियांना शिक्षण देण्याची खास व्यवस्था केली. त्यासाठी आपल्या पत्नी रमाबाई व भाची श्रीमती अंबूताई पटवर्धन यांना संगीताचे शिक्षण देऊन तयार केले. 

१९०८ साली ते मुंबईस आले व मुंबईत त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हे विद्यालय खूप भरभराटीस आले. सँडहर्स्ट रोडवर १९१४ साली या विद्यालयाने स्वतः च्या मालकीची इमारत बांधली. विष्णुबुवांनी आपल्या हयातीत शंभर-दीडशो विद्यार्थ्यांचे पालनपोषण करून त्यांना संगीतविद्या दिली. 

१९५२ सालापासून ते तुलसीदासाच्या रामायणावर प्रवचने करु लागले व त्या द्वारे त्यांनी संगीताचा समाजात प्रसार केला. संगीताची प्राचीन मौलिकता त्यांनी जतन केली. रघुपती राघव राजाराम हे भजन त्यांनी जनसामान्यांत अत्यंत लोकप्रिय केले. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत प्रत्येक सभेत म्हण्याची प्रथा त्यांनीच रूढ केली. 

आपले विद्यार्थी घेऊन प्रचारासाठी ते देशभर अनेक वेळा फिरले. अशा तऱ्‍हेने संगीताचा प्रसार त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्‍यांतून केला. स्वतःची एक वेगळी अशी संगीतलेखनपद्धती यांनी निर्माण केली व या पद्धतीने सुमारे साठ पुस्तके लिहून प्रसिद्ध केली. त्यांत संगीत बालप्रकाश, राग प्रवेश, संगीत बालबोध, स्वल्पालाप गायन, टप्पा गायन, होरी, मृदंग – तबला पाठ्यपुस्तक, रामनामावली, रामगुणगान ( मराठी ) बंगाली गायन, कर्नाटकी संगीत, बालोदय संगीत, व्यायाम के साथ संगीत, महिला संगीत, राष्ट्र्रीय संगीत, भारतीय संगीत लेखन पद्धति , इ. हिंदी-मराठी पुस्तकांचा अंतर्भाव होतो.

 

पं. विष्णुबुवांचे संगीतक्षेत्रातील कार्य संगीतोद्धाराचे होते. संगीतक्षेत्रात नेतृत्व करून समाजात या कलेला प्रतिष्ठा देण्याचे व त्याविषयी अभिरुची निर्माण करण्याचे, तसेव संगीतकलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे, तसेच संगीतकलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे कार्य त्यांनी केले. मिरज येथे त्यांचे निधन झाले.

त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव १८ ऑगस्ट १९७१ ते डिसेंबर १९७३ या कालावधीत सर्व देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

त्यांचे सुपुत्र पंडित दत्तात्रय विष्णु पलुस्कर (१९२१–१९५५ ) हेही अत्यंत नावाजलेले गायक होते. पंडित विष्णु दिगंबरांच्या संगीतप्रसाराची व गायकीची परंपरा जतन करण्याचे आणि जोपासण्याचे कार्य त्यांच्या अनेक शिष्यांनी त्यांच्या हयातीनंतरही निष्ठेने चालू ठेवले. या त्यांच्या प्रचंड शिष्यवर्गात पं. श्रीकृष्ण हरी हिर्लेकर, पं.वामनराव पाध्ये, पं विनायकराव पटवर्धन, पं शंकरराव व्यास, पं. नारायणराव व्यास, पं. ओंकारनाथ ठाकूर, प्रा, बा.र. देवधर, सुंदरम् अय्यर, श्रीमती जानकी रघुनाथ ऊर्फ अंबूताई पटवर्धन, पं. रघुनाथराव पटवर्धन, पं नारायणराव खरे, पं.वि,अ. कशाळकर, पं. शंकरराव पाठक, पं, वामनराव ठाकर, पं शंकरराव बोडस व पं. विष्णुदास शिराली या संगीतक्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींचा अंतर्भाव होतो.

सदर्भ मराठीविश्वकोश

 

Previous Article

यूपीएससी परीक्षा 

Next Article

मराठी ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते

You may also like