Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आचार्य अत्रे

Author: Share:
प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे (१३ ऑगस्ट  १८९८ – १३ जून १९६९) हे मराठीतील हुरहुन्नरी व्यक्तिमत्व! महाराष्ट्राने ज्या व्यक्ती आणि वल्लींवर प्रचंड प्रेम केले त्यापैकी एक अग्रणी! लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते अशा असंख्य रूपात महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध करणारा एक अवलिया!
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते एक महत्वाचे नाव आहे. आचार्य अत्र्यांची हशा आणि टाळ्या वसूल करणारी घणाघाती भाषणे आजही लोकांच्या लक्षात आहेत. ज्यांनी ती ऐकली नाही ते त्यांच्या पुस्तकातून ती वाचत आहेत.
शिक्षणक्षेत्रात त्यांचे कार्य अपरिमित आहे. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला. १९२३ साली अत्र्यांनी ‘अध्यापन’ मासिक सुरू केले. इ१९२६मध्ये ‘रत्नालकर’ व इ१९२९ साली ‘मनोरमा’, आणि पुढे १९३५ साली ‘नवे अध्यापन’ व १९३९ साली ‘इलाखा शिक्षक’ ही मासिके काढली. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी “नवयुग वाचनमाला” व दुय्यम शाळेसाठी “अरुण वाचनमाला” ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
१९ जानेवारी १९४० रोजी त्यांनी नवयुग हे साप्ताहिक सुरू केले. १९६२पर्यंत ते चालू होते. २ जून १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. १५, नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
मित्रासाठी तोंडावर माधुर्याची रसगंगा आणि शत्रूवर जळजळीत शिव्यांचे अंगार अशी दोन टोके त्यांच्या गगनभेदी व्यक्तित्वाचा भाग होती. भयंकर (त्यांच्याच शैलीत) विनोदशैली आणि नर्मविनोदी हजारजबाबीपणा त्यामुळॆ त्यांची भाषणे दणकून होत. प्रेक्षकांची हसून मुरकुंडी वळायची. प्रचंड हशा आणि प्रचंड टाळ्या अशा दोन शब्दातच त्यांच्या भाषणाचे वर्णन करू जाणे!
पत्रकारिता असो वा साहित्य किंवा अध्यापन , सामाजिक बांधिलकी, दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे,अज्ञानी, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.
ऐसा माणूस दहा हजार वर्षात होणे नाही! महाराष्ट्राला ललाळभूत असलेल्या या अवलियास स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!
संदर्भ: विकिपीडिया
Previous Article

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Next Article

निमित्त मराठा क्रांती मोर्चा . ….!

You may also like